बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:43 IST)

उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळेच ‘डीअर पार्क’च्या जागचे हस्तांतरण!

तळवडे येथील प्रस्तावित ‘डीअर पार्क’च्या जागेचे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतर करण्यासाठी महसूल व वन विभागाने मंजुरी दिली. याकामी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीच लक्ष घातले होते. स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर आणि सहकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, अशी टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे. ‘डीअर पार्क’च्या आरक्षण हस्तांतराच्या मुद्यावरुन भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी असा श्रेयवाद रंगला आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या दालनामध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
 
माजी आमदार लांडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर उभे राहीले आहे. महापालिकेतील भाजपा सत्तेच्या काळात जे प्रकल्प झाल्याचा दावा केला जात आहे. त्या प्रकल्पांसाठी अजित पवार यांनीच नियोजन करुन ठेवले आहे. राष्ट्रवादीने केलेल्या कामाचेच श्रेय भाजपाचे स्थानिक नेते घेत आहेत.
 
महापालिकेचे सुमारे १२५ कोटी रुपये वाचवले…
 
तळवडे येथील ‘डीअर पार्क’च्या आरक्षणाचे हस्तांतरण करण्यासाठी महसूल व वन विभागाला सुमारे ५९ एकर जागेसाठी अंदाजे १२५ कोटी रुपये मोबदला स्वरुपात द्यावे लागले असते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातल्यामुळे ही जागा विनामोबदला महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून आम्ही पाठपुरावा केला आहे. पूर्वी नेमलेला वास्तुविशारद काम करीत नव्हता. त्याला बदलून नवीन वास्तुविशारद नेमण्यासाठीही आम्हीच पाठपुरावा केला, अशी भूमिका नगरसवेक पंकज भालेकर यांनी मांडली.