सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (10:29 IST)

मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये तणाव; भाजपची बंदची हाक

त्रिपुरामधील धार्मिक तणावाच्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही काही ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी मालेगाव, नांदेड आणि अमरावती अशा ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
मंत्री छगन भुजबळ यांनी लोकांना शांततेचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तर राज्य सरकारचं परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.
 
मालेगावमध्ये त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात बंदची हाक देण्यात आली होती. दुपारपर्यंत बंद शांततेमध्ये सुरू होता. मात्र त्यानंतर त्याला हिंसक वळण लागत दगडफेक करण्यात आली. तर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला. दुसरीकडे नांदेडमध्ये काही लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीत पोलीस अधिकारीदेखील जखमी झाले आहेत.
 
त्याशिवाय अमरावतीमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं आहे. काही ठिकाणी तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
अमरावतीत मोर्चाला हिंसक वळण
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंदोलक सहभागी झाले होते. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानं शहरात तणाव निर्माण झाला.
 
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ शहरातील काही भागात व्यापाऱ्यांनी दुकानं सकाळपासून बंद ठेवली होती. त्यानंतर जयस्तंभ चौकातून मोर्चाला सुरवात झाली. पण मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली.
 
त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये 20 ते 22 दुकानांची तोडफोड झाल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलकांनी अनेक भागांमध्ये दगडफेकही केली.
 
दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे CCTV फुटेज तपासल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती अमरावतीचे प्रभारी पोलीस आयुक्त एम. मकानदार यांनी दिली आहे.
 
मालेगावात दगडफेक आणि लाठीचार्ज
 
मालेगावमध्ये रझा अकादमीसह इतर मुस्लीम संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली होती. त्रिपुरातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बंद दुपारपर्यंत शांतपणे सुरू होता.
 
मात्र काही लोकांनी मोर्चा काढत काही परिसरातील व्यापारी संकुलात सुरू असलेली दुकानं बंद करण्यासाठी दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली. शीघ्र कृती दलाच्या जवानांसह त्यांच्या वाहनांवरही जमावातर्फे दगडफेक करण्यात आली. त्यामुळं पोलिसांना लाठिमार करावा लागला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
शहरात काही भागात घडलेल्या या घटनेची माहिती पसरताच इतर ठिकाणची दुकानं बंद करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांच्या वाहनांचं नुकसान झाले असून काही नागरिकही किरकोळ जखमी झाले आहेत.
अफवा पसरवणाऱ्यां विरोधात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिले आहेत.
 
"मालेगावमधली परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा, असं आवाहान नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलं आहे.
 
3 ते 4 हजाराचा होता जमाव
नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत मालेगावातील घटनेबाबत माहिती दिली. काही संघटनांनी मालेगाव बंदचं आवाहन केलं होतं, त्यानुसार पोलिस तैनात होते, असं ते म्हणाले.
 
"अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळानं निवेदन दिल्यानंतर 400-500 लोकांचा जमाव आला. त्यांना परवानगी नव्हती. त्यांनी तोडफोड केली. एक हॉस्पिटल आणि काही दुकानांची तोडफोड केली."
 
त्यानंतर अधिकारी पोहोचले आणि परस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जमाव 3 ते 4 हजारांचा झाला होता. त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला असं त्यांनी सांगितलं.
 
यामध्ये 3 पोलीस अधिकारी आणि 7 कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी 2 जण गंभीर जखमी आहेत. तसंच पोलीस मित्र असलेले 2 नागरिकही जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
नांदेडमध्ये पोलीस अधिकारी जखमी
नांदेडमध्येही त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दुपारी अडीच वाजेनंतर शहरातील काही भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
 
प्रामुख्यानं शहरातील शहरातील नई आबादी, शिवाजीनगर आणि देगलूर नाका परिसरात जमावानं दगडफेक करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 
देगलूरनाका परिसरात जमावानं घोषणाबाजी करत दगडफेक केली. यावेळी या दगडफेकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले आहेत.
 
या प्रकारानंतर संबंधित ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. सुमारे दोन ते तीन तासांच्या तणावाच्या या परिस्थितीनंतर परिसरात पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे.
 
"नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात मोठा जमाव जमला होता. हा जमाव पोलिसांचे म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. या जमावाने पुढे चाल केली असती तर अनिष्ट प्रकार घडू शकले असते त्यामुळे आम्ही जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधराच्या नळकांड्या फोडल्या. शिवाय प्लास्टिक बुलेटचा देखील वापर केला," अशी माहिती नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिली आहे.
 
त्रिपुरामध्ये काय घडलं?
देशाच्या ईशान्येला असलेल्या त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकाराची प्रतिक्रिया म्हणून याकडं पाहिलं जात आहे.
बांगलादेशातील घटनेनंतर याठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि जमात-ए-उलेमा (हिंद) अशा धार्मिक संघटना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
 
त्रिपुरा हे राज्य बांगलादेशला अगदी लागून असल्यामुळं याठिकाणी हा तणाव पसरल्याचं सांगितलं जात आहे. याठिकाणी विविध गटांकडून एकमेकांच्या विरोधात हिंसाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
 
या हिंसाचारामध्ये अनेक खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करत असल्यानं, त्यावरूनही रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
पोलिसांनी खोटे फोटो, व्हीडिओ किंवा आक्षेपार्ह माहिती पसरवून त्या माध्यमातून धार्मिक तणाव वाढण्याचा धोका असल्यानं, कारवाई केल्याचं म्हटलं आहे. तर यूएपीएच्या माध्यमातून ठरावीक गटाला लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा आरोप, याला विरोध करणाऱ्यांनी केला आहे.
 
गृहमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन
त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात नांदेड, मालेगाव, अमरावती आणि इतर काही ठिकाणी हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं सर्व समाजबांधवांनी शांतता राखावी, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. राज्य सरकारचं परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण आहे. मी स्वतः याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत नजर ठेवून आहे. यात दोषी आढळणाऱ्यांना माफ करणार नाही. मात्र सध्या सर्वांनी सामाजिक ऐक्य राखून सहकार्य करावं, अशी विनंतीही वळसे पाटील यांनी केली.
 
अफवांना बळी पडू नका-भुजबळ
त्रिपुरामध्ये झालेल्या प्रकारानंतर काहीठिकाणी दगडफेक झाली. मोर्चे निघाले. त्यानंतर अफवाचं पिक आलेलं आहे. मात्र या सर्व अफवा खोट्या असल्याचं छगन भुजबळ म्हणालेत.
 
"पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. पोलिसांचे सगळे अधिकारी संबंधित ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळं आपणही शांतता बिघणार नाही याची काळजी घ्यावी."
 
"काही शक्ती मुद्दाम दंगली व्हाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या जाळ्यात अडकून चालणार नाही. आताच आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो आहोत. पुन्हा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ते परवडणार नाही," असंही भुजबळ म्हणाले आहेत.
 
भाजपची कारवाईची मागणी
"त्रिपुरातील कथित घटनांचं भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी," अशी मागणी विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
भाजपतर्फे उद्या अमरावती बंद
"अमरावतीमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्यातरी कपोलकल्पित घटनेच्या विरोधात 30-40 हजार जण रस्त्यावर येतात. या मोर्चाला परवानगी कोणी दिली," अशा सवाल भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.
 
"लग्नाच्या वरातीला परवानगी देत नाही, तिथं एवढ्या मोठा मोर्चा निघतो. शांततेनं न जाता दुकानं फोडणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यानंतरही प्रशासन, आमदार, पालकमंत्री शांत कसे राहतात," असंही अनिल बोंडे म्हणाले.
 
सरकारनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मग लोकांच्या जीवाची हमी कोण देणार. त्यामुळं सुरक्षा हवी असेल तर अमरावती बंद करण्याचं आवाहन बोंडे यांनी केलं आहे.