रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (21:46 IST)

बारसूवरून ठाकरे बंधू बरसले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय म्हणाले, वाचा इथे

raj uddhav thackare
रायगडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत होऊ घातलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्याला हात घातला.
 
महाडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुरू झाली असून, या सभेत उद्धव ठाकरेंनी बारसूच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "काही लोकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाही. माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही."
 
जोपर्यंत कोकणी बांधव प्रकल्प व्हावं, असं म्हणत नाही, तोपर्यंत काहीही झालं तरी प्रकल्प होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
* बारसूत मातीची चाचणी करताय, मग भूमिपुत्रांचीही चाचणी करा
* प्रकल्प आणायचा असेल, तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेत नाही?
* प्रकल्प आणल्यानंतर तिथल्या लोकांनी भिकेचा कटोरा घेऊन फिरायचं का?
* कोकणच्या भूमीवर उपऱ्यांचा वरवंटा का चालवताय?
* कर्नाटकात बंजरंगबलीच्या नावानं मतं मागता, मग तुमची ताकद कुठे गेली? मोदी धार्मिक प्रचार करतायेत.
* मराठी माणसाविरोधात मतं मागण्यासाठी मिंधे कर्नाटकात भाजपचा प्रचार करतायेत.
* उद्धव ठाकरेला संपवायचंय ना? हे समोर बसलेले माझे कुटुंबीय आहेत.
* मी माझ्या नातेवाईकांसाठी (बारसूवासीय) लढतोय, तुम्ही उपऱ्यांसाठी लढताय.
* आमचं हिंदुत्त्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्त्व नाही. भाजपचं हिंदुत्त्व काय आहे? भाजपचं हिंदुत्त्व गोमूत्रधारी.
* सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसला होतात, तेव्हा काय सोडलं होतं?
* मोहन भागवत मशिदीत गेले, तेव्हा त्यांनी काय सोडलं होतं?
* कुत्रे पकडणाऱ्या गाडीसारखं भाजपची गाडी. दिसला भ्रष्टाचारी की घेतला भाजपमध्ये.
* बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी.
* लालू प्रसाद यादवांची गर्भवती सून बेशुद्ध होईपर्यंत त्रास दिलात,  हे तुमचं हिंदुत्त्व आहे का?
* महाडमध्ये भगवा फडकला पाहिजे. पण भगव्याचं महत्त्वं समजून घ्या.
* या देशात पुन्हा हुकूमशाही येते की काय, याची मला चिंता.
* तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी माझी धगधगती मशाल घेऊन येतो.
* हे सरकार सुद्धा हलायला लागलंय. सरकार येतं आणि जातं. कायद्याचं नाव घेऊन पोलिसांनी अत्याचार करू नये. आमचं सरकार आल्यावर एक एक लाठीचा हिशेब मागू.
* माझ्या हातात काहीही नसताना, हे माझ्यासाठी सगळे जमतात, हे आशीर्वाद पुरेसे आहेत.
 
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
* कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रलंबित राहाण्याची, प्रश्न उभे राहाण्याची कारणं तुम्ही (लोक) आहात. त्याच त्याच पक्षाला निवड़ून देऊन त्या पक्षाने अख्ख्या कोकणाचा व्यापार करुन ठेवलाय. तुम्ही तिथेच. तिच माणसं निवडून येतात. राज्य सरकारमध्ये त्या नेत्यांना काहीही किंमत नाही.
* 2007 साली मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं अजून तो पूर्ण झालेला नाही. तुमचे खासदार आमदार कुठे आहेत. त्यांना माहितीये काम केलं नाहीतरी तुम्ही मतं देणार.
* 16 वर्षं झाली अजून पूर्ण झालं नाही. मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, त्यांनी गडकरींना फोन करायला सांगितला. मी त्यांना या रस्त्याची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, कंत्राटदारच पळून गेले.
* ज्यांना आजपर्यंत तुम्ही निवडून दिलं. त्यांच्यापैकी एकाला तरी विचारलं का हे लोक का पळून गेले. ते फक्त मतदानाशी संबंधित आहे. निवडून आले आमचे आम्ही, तुमचे तुम्ही.
* तिकडे समृद्धी महामार्ग चार वर्षांत सुरूही झाला. शिर्डीपर्यंत गाड्या रस्त्यावर फिरायलाही लागल्या. कोकणात 16 वर्षे होऊन रस्ता पूर्ण होत नाहीये. याचं कारण तुम्हाला गृहित धरत आहेत.
* बारसूचं नाव कोणी आणलं? या सगळ्या गोष्टी होतायत कुठून? तुमच्या जमिनी पायाखालून जातायत तुम्हाला समजत कसं नाहीये, या लोकप्रतिनिधींना आधी कळतं इथं प्रकल्प होणारे ते कवडीमोल जमिनी घेतात आणि प्रकल्पावेळी हजारोपटीने पैसे घेतात.
* नाणारला विरोध झाला तेव्हा बारसू नवं नाव आलं. जमीन विकताना तुम्हाला कळलं नाही का?
* होळी गणपतीला येता तेव्हा चर्चा करत नाही का? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र समोर असतात, कवडीमोल किंमतीने घेतात आणि सरकारला मोठ्या किंमतीत विकतात, तुम्हाला समजत कसं नाही?
* इतका प्रतिभासंपन्न कोकण आहे. तुम्हाला तरीही मूर्ख बनवत आहेत? ज्या शिवछत्रपतींनी आपला शत्रू समुद्रमार्गे येऊन जमिनी घेऊन राज्य करेल असं सांगितलं होतं. म्हणून त्यांनी आरमार उभं केलं. इथल्या भाट्ये गावातले वेंताजी भाटकर आणि मायनाक भंडारी यांनी आरमार सांभाळलं.
* तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व राहाणार नाही. तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे तुम्ही या तुमच्या तुकड्याचे मालक आहात. त्यावर तुम्ही उभे आहात. जमीन म्हणजे भूगोल. इतिहासात आपण आक्रमणं शिकलो ती भूगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादाक्रांत केली, जमीन ताब्यात घेतली. या प्रदेशाची जमीन ताब्यात घेतली त्याला आपण इतिहास म्हणतो.
* शिवछत्रपतींचं जे स्वप्न पुढं पेशव्यांनी पूर्ण केलं ते म्हणजे आपला भगवा अटकेपार फडकवला. अटक किल्ल्य़ावर भगवा लागला. जमिन ताब्यात घेतली आपण.
* तुम्ही तुमच्या जमिनी अमराठी व्यापाऱ्यांना विकताय? कोणासाठी जमिन सोडतोय याचं भान नाही तुम्हाला.
* एन्रॉनला तुम्हीच जमीन दिली, तुम्हाला माहितीच नव्हतं इथं एन्रॉन येणारे. मग जैतापूरच्या जमिनी त्यांनी हजारोपटीनं विकल्या.
* नाणार, बारसू प्रकरण झालं तेव्हा मला संताप आला होता. मला कोकणवासीयांशी एकदा बोलायचंच होतं. माझ्या कोकणातल्या तरुणांना काहीच दिलं नाही. ज्या गोष्टी कोकणात आहेत त्यावर केरळसारखं एक राज्य सुरू आहे. हे प्रकल्प केरळ गोव्याला का जात नाहीत. तुमच्याकडे निसर्गाने जे दिलंय त्याची आम्हाला किंमत नाही. आमचा संबंध एकमेकांशी येतच नाही. आमचा संबंध फक्त होळी गणपतीपुरता येतो. सह्याद्री पर्वतरांग, छत्रपतींचे किल्लेही नीट ठेवता आले नाहीत आपल्याला.
* काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचं कुणीतरी काढलं. मी काय बोललो हे बाजूला ठेवून माझा स्मारकाला विरोध आहे असं पसरवलं गेलं.
* शरद पवारांच्या तोंडून कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही. शाहू फुले आंबेडकर मोठे होतेच पण सर्वप्रथम शिवछत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे. मराठी लोक म्हणजे शिवछत्रपतींच्या भूमित राहाणारे. जे कधी त्यांचं नाव घेत नव्हते माझ्याबद्दल माहिती पसरवत होते. शिवछत्रपतींचे महाराष्ट्रात अनेक पुतळे आहेत. जयंती, पुण्यतिथीला हार घालणे एवढंच उरतं मग.
* शिववछत्रपतींच्या समुद्रातल्या स्मारकापेक्षा गडकिल्ले दुरुस्त करा असं मी सांगितलं होतं. गडकिल्ले ही खरी स्मारकं आहेत. पुढच्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवणार आहोत का?
कोकण फक्त पर्यटनावर अख्ख्या महाराष्ट्र पोसू शकतो. राज्यकर्त्यांना त्याचं काहीच देणंघेणं नाही. सगळ्यांना प्रदेशात विभागायचं मग जातीत विभागायचं असं सुरू आहे.
* महापुरुषांनाही विभागून ठेवलंय शिवछत्रपती मराठ्यांचे, डॉ. आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्यांचे हे सगळं राजकीय स्वार्थापोटी केलं गेलंय. त्यातच तुम्हाला गुंगवून ठेवलं जातं. त्यातच तुम्ही राहिलात जमीन, रस्ते कशाला लागतात.
* जातीच्या नावाने बोंब मारत बसायचं. हेच या नेत्यांना हवंय. यांना माहिती असतं प्रकल्प स्टेशन विमानतळ येणार हे त्यांना आधी माहिती असतं म्हणून ते आधीच जमिनी विकत घेतात, तुम्हाला त्याचा पत्ताच नसतो. जागे रहा.
* सगळं एकेदिवशी हाताखालून जाईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल. उद्या कोकणात दुसऱ्या भाषेत बोलणारे लोक येतील. आम्ही नुस्ती महापुरुषांची नावं घ्यायची. शिवछत्रपतींनी समुद्रमार्गे शत्रू येईल हे सांगितलं होतं आम्ही ऐकलं नाही.
* 1992 साली स्फोटाचं आरडीएक्स समु्द्रातून आलं, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गे आले. आमचं लक्षच नाही. आपण सतर्क राहिलो नाहीतर सगळं हातातून जाईल. सर्वांचा महाराष्ट्रावर डोळा आहे.
* नाणारची काही गरज नाही असं मी सांगितलं होतं. लॉकडाऊन आला. मग उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. आता हे परवडणारं नाही. मुळातच पहिल्यांदा यांना जमिनी द्यायच्या नव्हत्या. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती वाईट होईल की पगार देणंही परवडणार नाही. मग कोणतंही सरकार आलं तर ते कोलमडेल.
* बारसूत कातळशिल्पं सापडली आहेत. युनेस्कोनं त्याची दखल घेतलीय. अशा गोष्टींच्या तीन किलोमीटर अंतरावर काहीही करता येत नाही. उद्या युनेस्कोनं ते सरकारला सांगितलं तर ते करता येणार नाही.
 
* जमीन घ्यायला आलं की कशासाठी आलायस असं त्याला विचार. जमिनच तुम्हाला पैसे देईल, ती तुमच्याकडे ठेवा. घाईत काही करू नका. व्यापारी प्रतिनिधींना एकदा घरी बसवा. तुमचा राग यातून व्यक्त होऊदे. आम्हाला आजवर विकलंत आम्ही आता किंमत देणार नाही असं सांगा.
 
* शिवसेनेचा एक आमदार पाठिंबा देतो, खासदार देत नाही, पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता तेम्हणतायत लोकांची भावना ती आमची भावना. अरे वा मग तुम्हाला हवा होता म्हणून मुंबईचा महापौर बंगला ढापलात तो काय लोकांना विचारून ढापलात का? आता लोकांना विचारायला आलात काय?
 
* हे सगळे तुम्हाला फसवत आहेत. आजवर फक्त फसवत आलेत. अलर्ट राहा. तयारीने विचार करा या गोष्टींचा. कधी या प्रदेशाची धूळदाण करतील समजणार नाही. सगळ्यांचे व्यापाराचे हेतू आहेत. यातून माझा कोकण वाचा एवढीच विनंती करायला आलो.
 


Published By- Priya Dixit