अजित पवारांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते- शरद पवार
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यावर राज्यातील राजकीय चित्र बदलेल का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं, “न्यायालयात ज्यांच्याविरोधात केस आहे, त्यांच्याविरुद्ध निकाल लागला, तरी विधानसभेतील बहुमतावर काहीही परिणाम होणार नाही.”
बारसूतील आंदोलनाबद्दल विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “तेथील शेतकऱ्यांशी स्वत:हा मी चर्चा करत, त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत. उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही झाल्या आहेत. प्रकल्प होत असताना पर्यावरण, शेती मत्स्यव्यसायाचे नुकसान होणार नाही. याची खबरदारी घ्यावी लागेल. यासाठी स्थानिकांना विश्वास घेऊन पुढं जाण्याची आवश्यकता आहे. सक्तीने किंवा पोलिसांचा वापर करून हा प्रकल्प यशस्वी होऊ शकणार नाही. ते योग्यही नाही,” अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.
राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांबरोबर बाहेर जाण्याची सातत्याने चर्चा का केली जाते? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं, “सातत्याने काही घडलं का? काही लोक प्रचार करतात. काहींच्या कामाची पद्धत वेगळी असते. मी कुठेही गेलो, तर माध्यमांना बोलतो. पण, अजित पवार हे जमिनीवर काम करणारे आहेत. ते फार माध्यमस्नेही नाहीत.”
“काहीजण वृत्तपत्रात नाव कसे येईल, याची काळजी घेतात. अजित पवारांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते. आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची चिंता त्यांना असते. हा स्वभावातला फरक आहे. त्यामुळे असे गैरसमज पसवले जातात… असं काही नाही आहे,” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.
Edited By-Ratnadeep Ranshoor