शिवसेनेतील वादात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वादात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमुळे निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठविले होते. त्या ऐवजी ठाकरे गटाला वेगळे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले होते. यावरूनही पेच निर्माण झाला होता, त्यावर आज निकाल आला आहे.
निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दावा निकाली निघेपर्यंत शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले होते. तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरे गटाला मशालीचे चिन्ह दिले होते.
हे चिन्ह समता पार्टीला देखील आधीच देण्यात आलेले होते. यावरून समता पार्टीने यावर दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. मशाल हे निवडणूक चिन्ह आमचे आहे, यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात येऊ नये. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी समता पक्षाने केली होती. यावर आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने निकाल दिला आहे. समता पक्षाची याचिका फेटाळून लावत मशाल हे चिन्ह ठाकरे गटासाठी कायम केले आहे.
काही वर्षांपूर्वी समता पार्टीचे विलीनीकरण झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह गोठवले होते. आता ठाकरे गटाने मशाल चिन्हाची मागणी केल्यावर निवडणूक आयोगाने हे चिन्ह खुले केले होते.
Edited by: Ratnadeep Ranshoor