शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (16:32 IST)

मुलीच्या लग्नाची चिंता; एसटी चालकाची आत्महत्या

अपघात झाल्यामुळे पगारात होणारी कपात, मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सुरेवाडी येथे घडली. रामसिंग धनसिंग डेडवाल (वय ५७), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 
डेडवाल हे गेल्या २९ वर्षांपासून एसटी महामंडळात चालक होते. ते सुरेवाडी येथे दोन मुले आणि पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होते. डेडवाल यांनी शेतीवर कर्ज घेतलेले आहे. तसेच त्यांच्याकडून अपघात झाल्यामुळे त्याची भरपाई म्हणून त्यांच्या पगारातून कपात होत होती. पैशाची चणचण आणि वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. त्यांची बुधवारी साप्ताहिक सुट्टी होती. सकाळी रुममधील फॅनला ओढणी बांधत डेडवाल यांनी गळफास घेतला. दहा वाजले तरी ते खोलीबाहेर आले नसल्याने पत्नी आणि मुलीने हाका मारल्या, पण काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता डेडवाल यांनी गळफास घेतल्याचे दिसले. हर्सूल पोलिसांना माहिती देण्यात आली. डेडवाल यांना बेशुद्धावस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.