सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (22:35 IST)

चक्रीवादळात राज्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे आठ हजार घरांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत रविवारी केरळ, कर्नाटकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा दिला होता. त्यानंतर गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळाने सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरला मोठा तडाखा दिला. तुफान वादळी वारे आणि मुसळधार पावसाने येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले. चक्रीवादळात राज्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले  त्याचबरोबर चक्रीवादळामुळे कोकणसह राज्याच्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून मच्छीमारांच्या काही बोटींचेही नुकसान झाले आहे.

तौक्ते चक्रीवादळात राज्यातील सुमारे आठ हजार घरांची पडझड झाली.
त्यात सिंधुदुर्गातील सुमारे २ हजार घरे, रत्नागिरीतील ६१, रायगडमधील ५,२४४, ठाणे जिल्ह्यातील २४, पालघरमधील ४, पुण्यातील १०१, कोल्हापूरमधील २७ आणि साताऱ्यातील ६ घरांचे नुकसान झाले. तर 
चक्रीवादळाने नऊ जणांचा बळी घेतला. यात सिंधुदुर्गातील १, रत्नागिरीतील २, रायगडमधील ४ आणि उल्हासनगर, नवी मुंबईतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच या वादळात अनेकजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी भागात केलेली तयारी, मुंबईतील परिस्थिती इत्यादींबाबत त्यांनी माहिती विचारली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने केलेल्या सज्जतेची माहिती दिली आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.