बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (12:02 IST)

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले : कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही

आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
 
तसेच कोणतीही हानी झालेली नाही. महागाव तहसिलदार आणि त्यांची चमू यांनी गावांमध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली.
 
आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जीवित व वित्त हानी झालेली नासल्याचेही श्री इसळकर यांनी सांगितले . तरीही आमची चमू दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे असे उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी सांगितले.