शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:38 IST)

मृताच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

suicide
सोलापूर – शिक्षण उपसंचालकांच्या दिरंगाई व आडमुठ्या कारभाराला वैतागून चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिपाईपदावरील हनुमंत विठ्ठल काळे (वय ३६, रा. माडी ता. उ. सोलापूर) याने कुटुंबीयांसह स्वतःच्या शेतातील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात हनुमंत काळे हा मरण पावला तर पत्नीसह तीन मुले बचावली.दरम्यान, याप्रकरणी शिक्षण उपसंचालकांवर कारवाई करण्यात यावी, मृताच्या पत्नीला शाळेत किंवा शासनाच्या अन्य कोणत्याही विभागात नोकरी द्यावी तसेच मृत हनुमंत याचा गेल्या १३ वर्षांपासूनचा रखडलेला पगार द्यावा, या मागणीसाठी मृताचे कुटुंबीय व आदिवासी पारधी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. ही कैफियत ऐकून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या प्रकरणातील एकही दोषी सुटणार नसल्याचे आश्वासन मृताच्या कुटुंबीयांना दिले. यावर त्यांचे समाधान झाले नाही.
 
त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मारला. यावेळी पारधी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिपाई काळे आत्महत्या प्रकरणाने शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिपाईपदासाठी शालार्थ आयडी न दिल्याने त्या शिपायाचा पगार संस्थेने केला नाही. परंतु या प्रकरणात नेमकी चूक कोणाची, हे मात्र अजूनही समोर आलेले नाही. कुटुंबीयांनी मात्र उपसंचालकांवर आरोप केला आहे.