मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (08:55 IST)

महाराष्ट्रातल्या दोन गुटखा किंगचं भांडण आणि दाऊदने पाकिस्तानात उभारलं गुटख्याचं साम्राज्य

daud abrahim
अंडरवर्ल्ड किंवा डॉन म्हटलं की अवैध दारू कोकेन, हिरोईन सारखे अंमली पदार्थांची विक्री असं समीकरण असतं. पण गुटखा किंग आणि अंडरवर्ल्डमधील साट्यालोट्यामुळे भारतीय संघटित गुन्हेगारीचा एक वेगळाच अध्याय भारत आणि पाकिस्तानात घडला.
 
मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी, बेटिंग, अपहरण, खंडणीचे गुन्हे ज्या दाऊद इब्राहिमवर नोंदवले गेले आहेत त्याच दाऊदने गुटखा व्यवसायातूनही पैसा कमावला. पाकिस्तानात दाऊद इब्राहिमने गुटख्याची फॅक्टरी सुरू केली आणि पाकिस्तानमध्ये गुटखा विक्री सुरू केली.
 
गुटखा म्हणजे सुपारी, कात, चुना, तंबाखू आणि काही रसायनं यांचं मिश्रण. तसं पाहायला गेलं तर गुटखा हा काही अंमली पदार्थ नाही, पण दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहिली तर गुटख्याची घातकता लक्षात येऊ शकते.
 
दाऊदने पाकिस्तानात गुटखा निर्मिती करण्याआधी पाकिस्तानातील लोकांना गुटख्याची सवयच नव्हती असे नाही. भारतातून अवैधरितीने गुटखा पाकिस्तानात जात असे. पाकिस्तानात गुटख्याला असलेली मागणी हेरून दाऊद इब्राहिम गुटखा निर्मितीत गेला आणि त्याने आपल्या डी कंपनीचा नफा वाढवला.
 
तो या व्यवसायात कसा आला याची ही गोष्ट.
दोन गुटखा किंगमधील वाद
रसिकलाल माणिकचंद धारिवाल अर्थात आर. एम. धारिवाल आणि जगदीश जोशी या दोघांमुळे दाऊद गुटखा निर्मितीत आला.
 
पुण्याजवळच्या शिरूर येथे विडी कारखानदाराचा मुलगा असलेल्या आर. एम. धारिवाल यांनी गुटखा निर्मितीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. नव्वदच्या दशकात प्रसिद्ध असलेला आरएमडी आणि माणिकचंद गुटखा ही धारिवाल यांच्याच कंपनीची उत्पादनं.
 
धारिवालच्या कामात त्याला एका सहकाऱ्याची साथ मिळाली. त्या तरुणाचं नाव होतं जगदीश जोशी अर्थात जे. एम. जोशी. धारिवालच्या कंपनीत काम करता करता त्याला व्यवसायाची नस सापडली आणि आपला व्यवसाय सुरू करावा या महत्त्वाकांक्षेनी त्याला ग्रासलं.
 
जे. एम. जोशीने गोवा गुटखा कंपनी स्थापन केली आणि माणिकचंद, आरएमडी या ब्रॅंडला टक्कर देण्यास सुरुवात केली. जुने सहकारीच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धक बनले. महाराष्ट्रातील गुटखा मार्केटमध्ये फक्त या दोघांचाच बोलबोला होता.
आपल्यामुळे जितका फायदा धारिवालला होतो तितका पैसा मला मिळत नाही ही खंत त्याच्या मनात होती म्हणून त्याने वेगळी वाट धरली तरी आधी कमावून दिलेला पैसा मिळावा यासाठी तो धडपडत होता. तर जोशी हा आपला नोकर आहे त्यामुळे त्याचा या पैशावर हक्क नाही, असं धारिवालला वाटत होतं.
 
जोशीकडे धारिवालच्या कंपनीचे समभाग होते. त्या समभागांच्या बदल्यात 259 कोटी रुपये मिळावेत असं जोशीला वाटायचं तर या समभागांवरचा हक्क जोशीने सोडावा असं धारिवालला वाटायचं.
 
जोशीला वाटायचं काही करून आपल्याला हे पैसे मिळायला हवे आणि धारिवालला वाटायचं ही रोजची कटकट आपल्यामागून जावी. यातून धारिवालच्या डोक्यात एक मार्ग शिरला त्यामुळे या दोघांच्या भविष्याची दिशाच बदलली.
 
या दोघांमधील वाद मिटला की नाही हे समजून घेण्याआधी आपण भेटू या गोष्टीतल्या एका महत्त्वाच्या पात्राला.
 
धारिवाल कसा पोहोचला अंडरवर्ल्ड पर्यंत?
दाऊद इब्राहिमला चार बहिणी आहेत आणि त्यापैकी सर्वांत छोट्या बहिणीचं लग्न झालेलं आहे हमीद अंतुलेशी. हमीद अंतुले हा दुबईत व्यावसायिक होता. तो भारतातून माल आणत असे.
 
हमीद अंतुलेच्या कंपनीचं नाव होतं द गोल्डन बॉक्स ट्रेडिंग लिमिटेड. ही कंपनी धारिवालची कंपनी धारिवाल टोबॅको प्रोडक्ट्स लिमिटेडकडून माणिकचंद गुटखा विकत घेत असे आणि पाकिस्तानमध्ये पाठवत असे.
 
पाकिस्तानी लोकांनाही भारतीय गुटख्याची चटक लागलेली होती. एस. हुसैन झैदी त्यांच्या 'डोंगरी ते दुबई' या पुस्तकात लिहितात त्यावेळी पाकिस्तानमध्ये गुटख्याची उलाढाल वर्षाला 300 कोटी रुपये इतकी होती. आणि पाकिस्तानात असलेली गुटख्याची मागणी पुरवत होता आर. एम. धारिवाल.
 
सीबीआयच्या प्रेस नोटनुसार 1996 ते 2001 या काळात धारिवालने अंतुलेला 46 कोटी रुपयांचा गुटखा पुरवला होता.
 
दाऊद इब्राहिम अनेक वर्षांपासून भारताबाहेर राहत असला तरी दाऊदची अंडरवर्ल्डवर पकड होती. त्यामुळे दाऊदच्या 'दरबारा'त अनेक जण आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटसाठी जात असत.
 
या व्यावसायिक ओळखीतूनच धारिवालला वाटले आपण दाऊद इब्राहिम अर्थात 'बडा सेठ'ची मदत घ्यावी. हमीद अंतुलेनी ही गोष्ट अनीस इब्राहिमला सांगितली.
 
अनीस इब्राहिम हा दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे आणि डी कंपनीत महत्त्वाच्या पदावर आहे. जेव्हा हमीद अंतुले दुबईहून गुटखा पाठवत असे तेव्हा तो कराचीत उतरवून घेणे आणि त्याचे वितरण करण्याचे काम अनीस करायचा.
 
अनीस इब्राहिमला गुटखा व्यवसायाची आवड होती. पाकिस्तानातील गुटखा व्यवसायावर त्याची बारीक नजर होती. पाकिस्तानमध्ये गुटख्याला भरपूर मागणी आहे पण त्याचा आपण तसा पुरवठा करू शकत नाही हे तो जाणून होता. त्याने भारतीय गुटख्यांची नक्कल करून लोकल गुटखा विकला होता पण त्यातून फारसं काही हाती आलं नव्हतं.
 
दाऊदकडून सेटलमेंट झाली पण...
अनीसच्या कानावर जेव्हा हे पडलं की दोन गुटखा किंगच्या भांडणात मध्यस्थी करायची आहे तेव्हा त्याने त्याला लगेच होकार कळवला आणि दोघांची भेट घडवून त्यांच्या भांडणावर तोडगा काढून देण्याचं आश्वासन दिलं.
 
सीबीआयच्या चार्जशीटनुसार, सप्टेंबर 1999 मध्ये धारिवाल आणि जे. एम. जोशी हे कराचीला गेले होते. तिथे ही बैठक पार पडली होती.
आर. एम. धारिवाल आणि अब्दुल हमीद अंतुले ( दाऊदचा मेहुणा) हे कराचीला गेला होता. धारिवाल व्हिसा किंवा कुठल्याही अधिकृत परवानगीशिवाय कराचीत पोहोचला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी जे. एम. जोशी हा व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहोचला.
 
सीबीआयच्या प्रेस नोटनुसार धारिवाल यांच्याकडून जोशीला 20 कोटी रुपये येणं होते. पण हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचं झैदी आपल्या पुस्तकात सांगतात.
 
हे भांडण जेव्हा दाऊदकडे पोहचलं तेव्हा दाऊदने तोडगा सांगितला की धारिवालने 7 कोटी रुपये जोशीला द्यावेत आणि 4 कोटी रुपये ही दाऊदची फी असेल.
 
सुरुवातीला जोशीचा दाऊदने दिलेल्या तोडग्याला विरोध होता. पण अनीस इब्राहिमने त्याला धमकावलं, त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला मारलं देखील. जोशीने धारिवालशी जुळवून घ्यावं असं देखील त्याला सांगण्यात आलं होतं, असं एका साक्षीदाराने सांगितल्याचं सरकारी पक्षाने म्हटलं होतं.
 
सरकारी पक्षानुसार, दाऊद इब्राहिमने जी वाटाघाटी केली त्यात दाऊदने धारिवालच्या बाजूनेच निकाल दिला. जोशी आणि धारिवाल यांच्यातील भांडण मिटवून
 
धारिवालचा 248 कोटी रुपयांचा फायदा होणार होता. हा पैसा दाऊदने आपल्या डी. कंपनीसाठीच वळता करून घेतल्याचे सरकारी पक्षाने म्हटले होते. 
या सौद्यातून आपलं नुकसान झालं आहे असं जोशीला वाटत होतं. मग अनीसला त्याला सुचवलं की तू आम्हाला पाकिस्तानात हा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत कर. तुझे पैसे तुला परत हवे असतील तर हे करणं आवश्यक असल्याचं अनीसने जोशीला सांगितलं.
 
भारतातून जोशीमार्फत मशीन्स मागवण्यात आल्या. गुटखा तयार करण्याच्या मशीन्स तसेच पाऊच पॅकिंगच्या मशीन्स मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून अली असगर कंपनीमार्फत मागवण्यात आल्या.
 
अनीस इब्राहिम आणि त्याचा सहकारी अफताब बटकी यांनी मिळून कराचीपासून 160 किमी दूर असलेल्या हैदराबाद शहरात 2004 साली 'फायर गुटखा कंपनी' सुरू केली.
 
'हे दोघेच या कंपनीचं कामकाज पाहत होते आणि कंपनीचा सर्वेसर्वा पडद्याआडच राहिला,' असं झैदी सांगतात.
 
कंपनी कशी सुरू झाली?
सीबीआयने जे चार्जशीट फाइल केले होते. त्या चार्जशीटमध्ये जमीरुद्दीन अन्सारी, राजेश पांचारिया, अनिस इब्राहिम कासकर, फारूक मन्सुरी, जे. एम. जोशी, आर. एम. धारिवाल, दाऊद इब्राहिम कासकर, अब्दुल हमीद अंतुले, सलीम मोहम्मद गौस शेख यांची नावे आहेत.
 
सीबीआयच्या प्रसिद्धिपत्रकानुसार फेब्रुवारी ते मे 2002 या दरम्यान, जमीरुद्दीन अन्सारी आणि अनीस इब्राहिमने जे. एम. जोशीला धमकावून पाच राजेश पांचारियाकडून गुटखा पाऊच बनवणाऱ्या पाच मशीन्स विकत घेतल्या. फारूक अहमद मन्सुरी मार्फत या मशीन्स दुबईला अनीस इब्राहिमकडे पाठवण्यात आल्या. या मशीन्सची किंमत 2.64 लाख इतकी होती.
 
मुंबई उच्च न्यायालयात जे. एम. जोशीने जामिनासाठी अर्ज केला होता. त्या खटल्याचा निकाल न्यायालयाने सर्वांसाठी खुला केला आहे. त्या निकालाच्या कागदपत्रांमध्ये सीबीआयच्या चार्जशीटमध्ये काय लिहिले आहे त्याचा उल्लेख आहे.
 
सीबीआयच्या चार्जशीटमध्ये असे म्हटले आहे की जे. एम. जोशीने त्याचा सहकारी बिजू होजे उर्फ बाबू हा पाकिस्तानला पाठवला. त्याला गुटखा बनवणे, मशीन्सची निगा राखणे इत्यादी गोष्टी येत होत्या. त्याच्याकडून तीन वर्षं काम करून घेण्यात आलं होतं.
 
कदाचित या सर्व गोष्टींची माहिती कधीच उघड झाली नसती पण मुंबई पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित जोडून पाहिल्या आणि एक मोठं कोडं सुटलं.
 
विजय साळसकरांना टिप मिळाली आणि...
दाऊद इब्राहिमचा या प्रकरणाशी असलेला संबंध सर्वप्रथम लक्षात आला तो पोलीस इन्स्पेक्टर विजय साळसकर यांना. 2004 मध्ये विजय साळसकर क्राइम ब्रांचमध्ये होते. त्यांना टिप मिळाली की अनीस इब्राहिमचा साथीदार वांद्रे भागात आला आहे.
 
पाकिस्तानला दुबईमार्गे गुटखा पॅकिंगच्या मशीन्स पाठवणारा जमीरुद्दीन अन्सारी उर्फ जंबो सॅंट्रो कारमध्ये होता. साळसकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि अन्सारीला पकडले. त्याच्याजवळ पिस्तुल सापडले.
 
त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. तपासावेळी त्याने सांगितले की दुबईला एक मोठं कन्सायन्मेंट जाणार आहे आणि त्यात गुटखा पॅकिंगच्या मशीन्स आहेत.
 
आणखी तपास केल्यावर त्यांना आढळलं की या केसमध्ये दाऊदचा देखील संबंध आहे. धारिवाल आणि जोशी या प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती याच तपासादरम्यान मिळाल्याचं साळसकरांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं होतं.
 
अन्सारीचा जबाब आणि तपासानंतर हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आली. 2005 मध्ये सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. अनेक वर्षांच्या तपासानंतर सीबीआयला दाऊदच्या गुटखा निर्मिती आणि विक्रीबाबतची माहिती मिळाली.
 
दुसरी गोष्ट म्हणजे अनीस इब्राहिम आणि डी कंपनीचा महत्त्वाचा माणूस सलीम चिपळूण यांच्यात गुटखा कंपनीच्या मशीन्स बिघडल्याबाबतचा संवाद मोबाईलहून सुरू होता. तो इंटरसेप्ट करण्यात आला होता. पोलिसांनी या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध जोडला आणि तपासाला गती मिळाली.
 
'जीवाच्या भीतीने मी हे केलं'
जमीरुद्दीन अन्सारीने जोशीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून या सर्व गोष्टी करून घेतल्या असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
 
प्रकरणाचा खटला मकोका अंतर्गत विशेष न्यायालयात चालला होता. या खटल्यावेळी एकूण 44 साक्षीदारांनी साक्ष दिली होती. या खटल्याचा निकाल जानेवारी 2023 मध्ये आला होता. या खटल्यात जे. एम. जोशी दोषी आढळला. त्याला या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली होती.
 
दाऊद इब्राहिम हा एक दहशतवादी असल्याचे माहीत असून देखील जोशीने त्याला मदत केल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले होते. दाऊदच्या सिंडिकेटला सातत्यपूर्ण आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळावा यासाठी गुटख्याचा व्यवसाय करण्यात आल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले होते.
 
जोशीने म्हटले होते की 'आपण मदत नव्हती केली तर जीवाच्या भीतीने मला हे काम करावे लागले.'
 
या निकालाविरोधात जोशीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'या संपूर्ण व्यवहारातून जोशीला कुठलाच फायदा झाला नाही उलट त्यांना त्रासच सहन करावा लागला त्यामुळे त्याची शिक्षा रद्द करावी,' असा युक्तिवाद जोशीकडून करण्यात आला होता.
 
अंडरवर्ल्डच्या दबावाला बळी पडून जोशीला हे पाऊल उचलावे लागल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने केले आणि मकोका विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षा स्थगित करून जोशीला 2023मध्ये जामीन दिला.
 
रसिकलाल धारिवालनी या आपल्यावरील आरोप फेटाळले होते. 2023 ला निकाल लागण्यापूर्वीच या प्रकरणातील आरोपी रसिकलाल धारिवालचं 2017मध्ये निधन झालं होतं.
 
पाकिस्तानमध्ये ओरल कॅन्सरचा वाढता धोका
पाकिस्तानमध्ये गुटख्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबतचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनी देखील दिला आहे. भारतानंतर गुटख्याचा सर्वाधिक वापर हा पाकिस्तानमध्ये होतो.
पाकिस्तानातील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन 2019मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की संपूर्ण दक्षिण आशियात पाकिस्तानी पुरुषांना ओरल कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे. ओरल कॅन्सरचे प्रमाण 4 टक्क्यांहून अधिक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ असा आहे की 100 कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 4 रुग्ण हे ओरल कॅन्सरचे आढळतात. हेच प्रमाण कराची शहरात 30 टक्के इतके आहे.
 
सिंध प्रांतात गुटखा आणि मावा खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे सिंध हायकोर्टाने गुटखा विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते.
 
एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, पाकिस्तानमध्ये गुटखा निर्मितीच्या कंपन्या असल्या तरीदेखील भारतात तयार होणारा गुटखा अवैधरित्या पाकिस्तानात येतो. कराचीत पाच पैकी एका व्यक्तीला गुटखा किंवा माव्याची सवय आहे.
 
अर्थव्यवस्थेचा डोलारा मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालतो असं म्हटलं जातं. गुटखा कंपन्यांमध्ये असलेला फायदा आणि पाकिस्तानात गुटख्याला असलेली मागणी पाहून ज्याच्या नावे रेड कॉर्नर नोटीस निघालेली आहे अशा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला देखील या व्यवसायात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यातून हा अध्याय घडला.
 
Published By- Priya Dixit