बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (21:35 IST)

बुद्धविचारांवर आधारीत असलेले देशातील उर्दू भाषेमधील पहिले पुस्तक

शिवदे यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन  
नाशिकमधील उर्दू भाषेचे अभ्यासक डॉ. रवींद्र शिवदे यांनी धम्मपदाच्या ४२३ गाथांपैकी १०० गाथांचे मूळ पाली भाषेतून ‘गौतम बुद्ध के अक्वाल -ए- जरीन’ या पुस्तकाच्या माध्यमातून उर्दू शायरीत रूपांतर केले आहे. अशाप्रकारे बुद्धविचारांवर आधारीत असलेले देशातील उर्दू भाषेमधले हे पहिले पुस्तक ठरले आहे. या पुस्तकाचा प्रकाश सोहळा दिनांक १९ डिसेंबर २०२१ला सायंकाळी ५ वाजता आय.एम.ए. सभागृह, शालीमार येथे संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तम कांबळे (साहित्यिक), प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (विचारवंत आणि साहित्यिक), जनाब अश्फाक अहमद खलिफा (उर्दू अभ्यासक) आणि जनाब इलियास लाल बेग मिर्झा (उर्दू अभ्यासक) यांची उपस्थिती लाभणार आहे.
 
विविध मानव समूहांतील द्वेष आज वाढत चालला असून त्यातून संघर्ष निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत भगवान बुद्धाची शिकवण खूप मोलाची आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी जगाला कल्याण आणि दु:ख मुक्तीचा मार्ग दाखवला. बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर हेच ज्ञान सर्वसामान्यांपर्यत पोहोचण्यासाठी बुद्धांनी अखंड भ्रमण करून ८० हजाराहून अधिक प्रवचने दिली. ही सर्व प्रवचने त्याकाळी जनसामान्यांत प्रचलित असलेल्या पाली व प्राकृत या लोकभाषांमध्ये दिली. या प्रवचनांचा सारांश ‘धम्मपद’ या ग्रंथात आहे. परंतु, उर्दू भाषेत अद्यापही धम्मपदाचे भाषांतर झालेले नाही. हीच गोष्ट लक्षात आल्यानंतर डॉ. रवींद्र शिवदे यांनी धम्मपदाच्या ४२३ गाथांपैकी १०० गाथांचे मूळ पाली भाषेतून उर्दू शायरीत रूपांतर केले. यासाठी  बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि विपश्यना साधनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. धनंजय चव्हाण यांनीही मदत केली आहे. भगवान बुद्धाचे संक्षिप्त चरित्र व विपश्यना साधनेची माहितीदेखील या पुस्तकात उर्दू भाषेत समाविष्ट केली आहे. सुमारे सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर सदरचे पुस्तक तयार झाले आहे.
बाईट
शाळेत असताना पर्शियन भाषेचा अभ्यास झाला. पुढे या भाषेच्या जवळ जाणारी अशी उर्दू भाषा आहे. त्यामुळे आवडीतून तिचाही अभ्यास झाला. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकात मानवी मूल्य , मनावर नियंत्रण, मानसशास्त्र, शुद्ध आचारण याविषयांवर आधारित असलेली धम्मपदे रुपांतरीत केलेली आहेत. जगात उर्दू भाषा अभ्यासणारा मोठा वर्ग आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना उर्दू भाषेत धम्मपदे वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.  बुद्धांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.
 
डॉ. रवींद्र शिवदे,
गौतम बुद्ध के अक्वाल -ए- जरीन पुस्तकाचे लेखक, उर्दू भाषेचे अभ्यासक