राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या निर्णयासाठी ५ मे रोजी निवड समितीची पहिली बैठक होणार
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी ५ मे रोजी निवड समितीची पहिली बैठक होणार आहे. शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहाणार नसल्याचे २ मे रोजी जाहीर केले. त्यासोबत त्यांनी एक निवड समिती देखील सुचवली आहे. या निवड समितीची पहिली बैठक ५ मे रोजी होणार आहे. दरम्यान, ही बैठक ६ मे रोजी होणार होती. ती ५ मेला घ्यावी असे शरद पवार यांनी सुचवले आहे. निवड समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही पवारांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटले तेव्हा पवारांनी मी दोन-तीन दिवसांत निर्णयाचा फेरविचार करेन असे जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होते, असे शरद पवार म्हणाले आहेत. पवारांनी त्यांच्या कालच्या भाषणादरम्यानच अध्यक्षपदासाठी एक समिती नेमण्याची सूचना केली. त्या समितीची ५ मे रोजी बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल, असंही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरची पवारांची ही पहिली प्रतिक्रिया आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor