मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (22:08 IST)

महापूरचा सांगली आणि कोल्हापूरसह एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका

राज्यात गेल्या काही दिवसांआधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. या महापुराचा कोकणातील महाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर अशा एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अनेकांनी आपले स्वकीय गमावले. वैयक्तिक नुकसानासह या पुरामुळे सार्वजनिक संपत्तीचंही नुकसान झालं. पुरामुळे काही ठिकाणी भूस्सखलन झाले, रस्ते खचले. काही ठिकाणी विजेचे खांबे कोसळले. या पुरामुळे सरकारी मालमत्तांचे नुकसान झालेच. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं. 
 
प्राथमिक अंदाजानुसार, सरकारी मालमत्तांचे 3 ते 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच तब्बल 3.38 लाख हेक्टरवरील शेतीचंही नुकसान झालंय. फक्त अतिवृष्टी आणि दरडींमुळे रस्त्यांचं तब्बल 1 हजार 800 कोटींचं नुकसान झालंय. पुलांचं 700 कोटींचं नुकसान झालंय. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाणांनी माहिती दिली. कोकणानंतर पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात नुकसान झालंय. इथील एकूण 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती. तर १४० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेले होते.