बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 26 जुलै 2021 (15:31 IST)

माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे.अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.तर रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे काही निष्पाप नागरिकांनी आपले प्राणही गमावले आहेत. चिपळूण, रायगड,कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे.पण, इतरवेळी अशी काही परिस्थिती इतर राज्यांवर आली तर पुरग्रस्तांची मदत करा असं म्हणणाऱ्या सेलिब्रिटींनी महाराष्ट्राबाबती का केलं नाही? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारत बॉलिवूड सेलिब्रिटींना मदतीचे आवाहन केले आहे.
 
अमेय खोपकर यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.“इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं.अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत.अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो,” असं अमेय खोपकर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.