शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (15:23 IST)

तळीये येथील शोध आणि बचाव मोहीम थांबविली

रायगड जिल्ह्यातल्या तळीये इथे दरड कोसळली.ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मृतदेहांना बाहेर न काढता तिथेच अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थ आणि स्थाानिक लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, शासन शोध आणि बचाव कार्य थांबवण्यास तयार नव्हतं.पण आता येथील शोध आणि बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला आहे.
 
तळीये इथं आत्तापर्यंत ५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. रविवारी ११ मृतदेह सापडले असले तरी ३१ जण मात्र ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात होतं. या अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करा आणि त्यांना बाहेर काढू नका अशी मागणी या गावातले नागरिक, मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे आता शोध आणि बचाव मोहीम थांबवत त्या ३१ बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
 
ढिगाऱ्याखाली या मृतदेहांचं विघटन सुरु झाल्यामुळे त्यांना बाहेर काढणं आणखी कठीण होणार आहे. ते पाहून त्यांच्या नातेवाईकांना अधिकच दुःख आणि वेदना होतील.त्यामुळे त्यांना बाहेर न काढणंच योग्य असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केली होती. गावातले लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आता मृतदेहांची अधिक विटंबना न करता त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली होती.