शिर्डीत ठाकरे गटाची ताकद वाढणार : शिर्डीचे 'हे' माजी खासदार आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील संमर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 'सुबह का भुला श्याम को घर लौटे तो उसे भुला नहीं कहते ' अशी प्रतिक्रिया वाकचौरे यांनी शिर्डीतून निघताना दिली आहे
.
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळं अहमदनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत 13 खासदार गेले आहेत. त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्यासह तगडा उमेदवार ठाकरे गटाला शोधावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली होती. यानंतर ठाकरे गटातून मोठी आऊटगोईग सुरू झाली.अनेक आमदार-खासदारांसह नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मैदानात उतरत पक्ष उभारणीला सुरूवात केली आहे. यानंतर त्यांना सोडून गेलेले काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.