बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (20:25 IST)

कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना मिळणार पगारवाढ..!

jail
पुणे:राज्यभरातील कारागृहात बंदीस्त असेलेल्या तसेच कारागृह उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्या अंतर्गत बंदी असलेल्या कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यवसायिक कौशल्याचे शिक्षण दिले जाते. कुशल बंदी, अर्धकुशल बंदी, अकुशल बंदी, खुल्या वसाहतीतील बंद्यांना ही पगार वाढ मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे कारागृह विभाग पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
 
याबाबत सविस्तर…
अमिताभ गुप्ता यांनी हि माहिती आज (१९ ऑगस्ट) रोजी दिली आहे. या पगारवाढीचा ७ हजर कैद्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरु करण्यात आलेले आहेत. या कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणारे कैदी हे बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रमाणे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठराविक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करत होते. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे.
 
कारागृह उद्योगात काम करणाऱ्या कुशल बंद्याना प्रती दिवस 74 रुपये, अर्धकुशल बंद्याना 67 रुपये, अकुशल बंद्याना 53 रुपये तर खुल्या वसाहतीतील बंद्यांना 94 रुपये अशी भरघोस पगार वाढ देण्यात आली आहे.राज्यातील सर्व 60 कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार कैदी काम करत आहेत. यामध्ये पुरुष कैदी हे 6 हजार 300 व महिला बंदी 300 च्या आसपास आहेत.
 
कारागृहाच्या भिंतीआड कैद असलेल्या कैद्यांना त्यांच्या सुधारणा व पुनर्वसनावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्माननीय नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी निरनिराळे व्यवसाय आणि कला यांचे शिक्षण देणारी विविध उद्योग कारागृहांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. कारागृहातील सर्व उद्योग हे प्रशिक्षण आणि उत्पादन पद्धतीच्या धरतीवर आहेत. कैद्यांना तिच्या उद्योगांमध्ये काम करतात त्या उद्योगाचे प्रत्यक्षिक सिद्धांतातील ज्ञान मिळते. कारागृहातील सुटल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना या उद्योगांची मदत होईल.