‘बेस्ट’ आणि ‘एसटी’ महामंडळाच्या बसचा बंदमध्ये सहभाग, वाहतुकीवर होणार थेट परिणाम
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या महाराष्ट्र बंदला मुंबईतील बेस्ट आणि एसटी बसचा समावेश असणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही वाहतूक सेवा बंद राहणार आहे.
विकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा आणि माहाविद्यालय बंद असणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असा शासनाचा निर्णय आहे.त्यामुळे बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही.बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करुन राज्य सरकारच्या निर्णयाचे उल्लंघन करत आहे,असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.