राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, पण सीमाप्रश्नाबाबत तारखांवर तारखा का पडतात, राऊत यांचा सवाल
जर न्यायालयात राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, किंवा सरकारच्या हिताचे जे इतर काही प्रश्न सुटू शकतात पण सीमा प्रश्न किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारचा विषय असेल त्यावर तारखांवर तारखा पडत आहेत, यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार थेट टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार असल्याने सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मधस्थी करावी, अशी मागणी करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शहांच्या सासूरवाडीला म्हणजेच कोल्हापूरला बसत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही, असे बोम्मई म्हणत आहेत. पण आम्ही म्हणतो, अमित शाहांना भेटून फायदा आहे. कारण सीमाभाग केंद्रशासित करण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय घेत असते. सीमाभागात धुडगूस सुरु असून त्याठिकाणी राज्यातील फौजफाटा काढून केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाखाली येतो, त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहे. सीमाभागातील मराठी भागावर अन्याय होतोय, चिरडलं जातंय, भरडलं जात आहे.
संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत, त्यांची पत्नी कोल्हापूरच्या आहेत, त्याचे सर्वात जास्त चटके कोल्हापूरला बसतात, सर्वात जास्त संघर्ष हा कोल्हापूरात होतो कारण कोल्हापूरात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा आहे. त्यामुळे त्यांना याबाबत जास्त माहिती आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
Edited by-Ratnadeep Ranshoor