रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (10:35 IST)

सावकाराने व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं

इंदापूरात व्याजानं दिलेल्या पैशासाठी एका तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत युवक 95 टक्के जळल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर तरुणाचा मृत्यू झाला. आरोपींना तात्काळ बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
 
व्याजाच्या पैशांसाठी आरोपींनी तरुणाचं अपहरण केलं होतं. 13 दिवस एका खोलीत कोंडून ठेवल्यानंतर आरोपींनी पैशांच्या बदल्यात जमीन नावावर करुन देण्याची मागणी केली. आरोपींच्या मागणीला नकार दिल्यानं आरोपींनी तरुणाला एका जंगलात नेऊन जिवंत जाळलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नवनाथ हनुमंत राऊत आणि सोमनाथ भीमराव जळक असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर शिवराज ऊर्फ शिवराम कांतिलाल हेगडे असं 27 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. 
 
मृत तरुण शिवराज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील रहिवासी आहे. शिवराज याच्यावर सोलापूरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचार सुरू असतानाच तरुणानं आरोपींविरोधात जबाब दिला ज्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
7 जून 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावून, चारचाकी वाहनात बसवून त्याचे अपहरण केले. तुझ्याकडे अद्याप व्याजाचे पैसे बाकी असल्याचं म्हणत आरोपींनी शिवराजला 13 दिवस एका खोलीत डांबून ठेवलं.  20 जून रोजी आरोपींनी फिर्यादी शिवराज उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जंक्शन फॉरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.
 
शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळून आग विझवली व मदतीसाठी रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर फिर्यादीच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार करण्यात आलं. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला. इंदापूर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.