रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (16:40 IST)

मुलाचं अपहरण, खंडणीमध्ये मागितले मुंडके

नागपुरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 15 वर्षीय विद्यार्थ्यांच अपहरण करुन त्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. आणि त्याहून विचित्र प्रकार म्हणजे आरोपीने खंडणी म्हणून मृतक मुलाच्या काकाचं मुंडकं कापून त्याचा फोटो व्हॉट्सअप मेसेज वर पाठवण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यानं अपहरणाच्या दोन तासांच्या आत मुलाची हत्या करण्यात आली आहे.
 
राज पांडे या 15 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. आरोपीनं हत्या करुन रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला आहे. आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी एका व्यक्तीच्या मुंडक्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची हत्या केली आहे.
 
नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सूरज शाहू असं आरोपीचं नाव आहे. अपहरणकर्त्याने खंडणीकरता मुलाच्या काकाचे शीर मागितले होते. राज पांडेच्या पालकाकडे अशी मागणी फोनवर केली होती. यानंतर काकाच्या मुंडक्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवा आणि मुलाला सोडवा अशी अजब मागणी आरोपीने केली होती. सध्या सूरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढील तपास सुरु आहे.
 
आरोपीने क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरच्या मंडळीने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
 
मृतक मुलाच्या काकावर असलेल्या रागातून आरोपीने राज पांडे या मुलाचं अपहरण केलं आणि आरोपीने घरी फोन करुन मृतकाच्या काकाचं मुंडकं कापून फोटो पाठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन तासांत मुलाची हत्या केली गेली.