तर 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होणार
मान्सून मागील काही दिवसांपासून कारवार आणि चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात दाखल झाला आहे. मात्र, मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात उष्णतेचा कडाका अद्यापही कायम आहे.
सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रांतील काही भागांत ढगाळ वातावरण असल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे. तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राज्यातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे.
राज्यातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. काही जिल्ह्यांमधील कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर वर्धा, नागपूर येथे 45 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात मान्सून 12 ते 13जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.