गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:17 IST)

शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी

शिवसेना नेते आणि मृद व जलसंधारण मंत्री, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाखयांच्याशी संबंधित मुळा एज्युकेशन संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या कर्मचाऱ्याने मंत्री गडाख आणि त्यांचे बंधू विजय गडाख यांची नावे घेतली. यामुळे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्या दोघांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गडाख यांच्या मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरीला असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे ((रा. नेवासा) या तरुण कर्मचाऱ्याने नुकतीच गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला असून तो व्हायरल झाला आहे. त्यात त्याने संस्थेतील वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालक म्हणून गडाख कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेतली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी संस्थेशी संबंधित 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यामधील चारजण ताब्यात घेतले आहे. पण यामध्ये गडाख कुटुंबीयांचा समावेश नाही. गडाख यांच्याविरोधात नगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे माजी आमदार मुरकुटे यांनी याही प्रकरणाचा उल्लेख करून चौकशीची मागणी केली आहे.
 
आमदार मुरकुटे यांनी म्हटले आहे की, काळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आहे. काळे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये जलसंधारण मंत्री गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी गडाख यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मंत्री गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.