शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 8 जून 2021 (11:27 IST)

“नाराजांची संख्या वाढू नये…,” ठाकरे सरकार पाडण्याच्या वक्तव्यांवर खडसेंची प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा नेत्यांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार पाडण्याची वक्तव्यं केली जात असून भाकीतंही वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात सरकार पडणार असल्याचे दावे भाजपा नेत्यांकडून केले जात आहेत. दरम्यान भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणाऱ्या एकनाथ खडसे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
 
“आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी दिली आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होऊ लागलं होतं. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते”.