1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (08:21 IST)

पक्षचिन्हाचा वाद संपेना त्यात आता मशालीवरही गदा, समता पार्टीने कोर्टात दाखल केली याचिका

uddhav thackeray
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यासाठी उद्धव ठाकरे  गट शिंदे गटासोबत न्यायालयीन लढाई लढत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागणार आहे. कारण समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील अमरनाथ सोसायटीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ  यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी सांगितले की, मशाल चिन्ह समता पार्टीचे चिन्ह आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केल्याचा आरोप मंडळ यांनी केला आहे. मशाल चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तीच खरी शिवसेना आहे आणि जे आता मशाल मशाल करतायत ती समता पार्टीची मशाल आहे ती त्यांची नाही, असेही मंडळ यांनी ठणकावून सांगितले आहे.
 
ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरलं आहे. आज त्यांचा अहंकार उध्वस्त झालाय. शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघालाय. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालय त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे ते आम्हाला मिळावं यासाठी  याचिका दाखल केल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी सांगितलं.
 
उदय मंडळ पुढे म्हणाले की ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना डी रजिस्टर आणि डी रेकग्नाइज याच्यातला अर्थ कळत नाही. त्यांना खासदार कुणी बनवलं ?  उद्धव ठाकरे यांनी जी गँग बनवली आहे ती अशिक्षित लोकांची टोळी आहे. अनिल देसाई किंवा संजय राऊत हे सगळे एकच भाषा बोलतात. जोपर्यंत मशाल त्यांच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. चोर तुम्ही आहात तुम्ही आमची मशाल चोरली असा पलटवार त्यांनी ठाकरे गटावर केला.
 
Edited by-Ratnadeep Ranshoor