दसरा मेळावा होणार या ठिकाणी इतकेच शिवसैनिक उपस्थित राहतील…..
शिवसेनेचा दसरा मेळावा 100 जणांच्या उपस्थितीत यंदा सावरकर स्मारक सभागृहात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क ऐवजी सभागृहात होईल असे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा घेणे हे मात्र शक्य होणार नाही असं स्पष्ट असल्याने शिवसैनिकांच्या उत्साहाचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. कोरोनामुळे गर्दी करण्यावर निर्बंध आहेत. जाहीर कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, सार्वजनिक उत्सव व अन्य बाबींवर निर्बंध आहेत, मंदिरे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा कसा घेता येईल, यावर शिवसेनेकडून विविध पर्यायांवर विचार सुरू आहे.
यंदाचा दसरा मेळावा वेगळ्या पद्धतीने केला गेला तरी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्याची परंपरा मात्र खंडित होणार आहे. शिवाजी पार्क ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हा सोहळा घेण्यासाठी शिवसेनेतर्फे चाचपणी सुरु आहे. तर काही व्यक्तींना या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची व्यवस्था देखील केली जात असून हा दसरा मेळावा देखील भव्यच असेल शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. इतर शिवसैनिकांना ऑनलाईनपद्धतीने सहभागी होता येईल असं देखील समजत आहे.