1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (10:28 IST)

शिंदे गटाचा प्रयत्न सुरुय की ठाकरेंच्या घराण्यातील व्यक्ती देखील आम्हाला कसे पाठिंबा देतात

jaidev thackeray
Twitter
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खू्र्चीवर जयदेव ठाकरे पाहायला मिळाले आणि त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन भाषणही केलं. एकनाथला कधीच एकटा नाथ होऊ देऊ नका ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, असं जयदेव ठाकरे म्हणाले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिंदे गटानं आज थेट उद्धव ठाकरे यांच्या बंधूंना व्यासपीठावर आणून मोठा धक्का दिला. जयदेव ठाकरे नुसते व्यासपीठावर आले नाहीत, तर त्यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूची खूर्ची दिली. तसंच जयदेव ठाकरे यांनी आपले विचारही सर्वांसमोर मांडले. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या धाकट्या भगिनीच्या कन्या किर्ती पाठक यांनी जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मला सध्याचं चित्र खूप दुर्दैवी आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्तींना हे बघताना त्रास होत आहे. शिंदे गटाचा प्रयत्न सुरुय की, ठाकरेंच्या घराण्यातील व्यक्ती देखील आम्हाला कसे पाठिंबा देतात, असं किर्ती पाठक म्हणाल्या.

Edited by : Ratnadeep Ranshoor