रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:21 IST)

कर्ज वाढल्यानं ST चालकाने उभ्या बसमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य

डोक्यावर कर्ज वाढल्यानं एसटी बसच्या एका चालकाने अहमदनगर मध्ये संगमनेर बस डेपो मध्ये थांबलेल्या बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
बस चालक सुभाष तेलोरे यांनी संगमनेर एसटी स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 
 
सुभाष तेलोरे हे पाथर्डी-नाशिक बसचे चालक होते. संगमनेर बस स्थानकामध्ये डिझेल नसल्याने नाशिककडे न जाता ते संगमनेर डेपो मध्ये थांबले होते. रात्री त्यांनी कापड्याच्या मदतीने बसमध्येच गळफास घेतला आहे. 
 
सुभाष हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डीचे रहिवासी होते. प्राथामिक माहितीनुसार, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि त्यामध्येच दबून त्यांनी आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आढळून आलेल्या चिठ्ठीवरुन कळून येत आहे. मात्र त्यात कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
बसचे वाहक पोपट साहेबा जावळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या सहकार्‍यांसह कामावर जाण्यासाठी डेपोतून बाहेर पडताना मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या असे म्हणाले. थोड्यावेळाने जेव्हा जावळे बसमध्ये आले त्यावेळी तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 
 
प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. पोलिस पुढील तपास करत आहे.