शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (11:25 IST)

शाहू महाराजांच्या पुढाकाराने तयार झालेला शिवपुतळा 96 वर्षांनीही दिमाखात उभा, काय आहे या पुतळ्याची गोष्ट?

सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि राज्यात पुतळ्यांवरून राजकारण तापायला सुरुवात झाली.मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पुतळा कोसळल्याने महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
 
विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे.अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभा करण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर शाहू महाराजांच्या पुढाकारातून राज्यात सर्वांत पहिल्यांदा स्थापन करण्यात आलेल्या पुतळ्याचीही चर्चा होत आहे.शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेल्या या पुतळ्याचं काम त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्यावेळी पूर्ण झालं.

96 वर्षांआधी उभारण्यात आलेला पुतळा अजूनही दिमाखात उभा, पण 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला, असं शिवप्रेमी म्हणत आहेत.हा पुतळा उभारावा, असं छत्रपती शाहू महाराजांना का वाटले, त्यांच्या मृत्यूनंतरही कसं काम चाललं, या सर्व गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत. हा पुतळा टिकण्याचे नेमके रहस्य काय हे देखील आपण यात पाहू.
 
छत्रपती शाहू महाराजांचा पुढाकार
शिवाजी महाराजांचा पुतळा असावा ही संकल्पना शाहू महाराज अनेक दिवसांपासून बाळगून होते.
एक चांगलं, लोकोपयोगी स्मारक उभारण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी त्याआधी प्रायोगिक तत्तवार लहान-लहान स्मारकं तयार केली होती.सिंधुदुर्गात शिवरायांच्या मंदिरासमोरील सभामंडप शाहू महाराजांनीच बांधला होता.त्या मूर्तीचा जीर्णोद्धारही केला होता. 'हे स्मारक म्हणजे माझ्या आत्म्याचा आवाज आहे,' असं शाहू महाराज त्यांच्या एका पत्रात म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची कल्पना सर्वप्रथम शाहू महाराजांनी मांडली होती. बीबीसी मराठीने इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांच्याशी बातचीत करून या पुतळ्याची गोष्ट जाणून घेतली.
 
वेगवेगळ्या शहरांचा विचार करून छत्रपती शाहू महाराजांनी या स्मारकासाठी शेवटी पुण्याची निवड केली. पुण्याला शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी होती तसंच लाल महालसारखी महत्त्वाची वास्तूसुद्धा पुण्यात होती, असं सावंत सांगतात.त्यासाठी पुण्याच्या भांबुर्डे गावात 1 लक्ष रुपये किमतीची साडेसात एकर जमीन खरेदी करण्यात आली.
 
सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची छत्रपती शाहू महाराजांना साथ
शाहू महाराजांना या स्मारकासाठी सर्व मराठा संस्थानिकांनी समर्थन दिलं.तसंच केशवराव जेधे, बाबुराव जेधे, स्टेट एक्झेक्युटिव्ह इंजिनयर व्ही. पी. जगताप तसेच सत्यशोधक समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. वेदोक्त प्रकरणानंतर ब्राहणेत्तर चळवळीचे कार्यकर्ते शाहू महाराजांच्या समर्थनात उभं राहिले. पुणे हा लोकमान्य टिळकांचा बालेकिल्ला होता.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुरुवातीच्या काळात पुण्यातील सनातनी मंडळींनी विरोध दर्शवला.त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाची पार्श्वभूमी होती.तसंच त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी पुतळ्याचे भूमिपूजन इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं. मात्र काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वात प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या दौऱ्यावेळी असहकार चळवळ सुरू करून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.

त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्याच्या कल्पना अडचणीची ठरली. मात्र, त्यावेळी ब्राह्मणेतर मंडळी काँग्रेसमध्ये नसल्याने त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचं ठरलं. सुरुवातीला हा विरोध बघता प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या वतीने भूमिपूजनास नकार देण्यात आला. मात्र, छत्रपती शाहू महाराजांनी शिमला गाठलं, आणि आपलं राजकीय वजन वापरून त्यांना भूमिपूजनासाठी तयार केलं, आणि सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची हमी दिली. ठरल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर 1921 मध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडला. काही मंडळींनी प्रिन्स ऑफ वेल्स यांना काळे झेंडेही दाखवले.1922 साली छत्रपती शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर हे काम त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी हाती घेतलं.

या पुतळ्याचं काम तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकार विनायक उर्फ नानासाहेब करमरकर यांना देण्यात आलं.राजाराम महाराजांनी त्यांना आपल्या बंगल्याच्या आवारातच काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.करमरकरांनी शिवचरित्राची पारायणे करून शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा उभारण्याचं निश्चित केलं. यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचा घोडा मॉडेल म्हणून वापरण्यात आला.
 
पुतळ्याची कलाकृती तयार होती, मात्र पुतळा ब्राँझचा बनवायचा असल्याने तेवढ्या भव्य पुतळ्यांचं ओतकाम करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती.माझगाव डॉकमध्ये एका ज्यू व्यक्तीकडे तशी यंत्रणा असल्याने ओतकाम त्यांच्याकडे सोपविण्यात आलं. ओतकामासाठी 150 कामगार झटत होते. शेवटी ओतकाम यशस्वी होऊन पुतळा तयार झाला.
 
पुतळा मुंबईहून पुण्यात आणण्याचे आव्हान
17 टन वजनाचा हा पुतळा मुंबईहून पुण्यास आणताना मोठी कसरत करावी लागणार होती.कारण रेल्वेने हा पुतळा नेणं शक्य नव्हतं, कारण पुतळ्याची उंची जास्त असल्याने बोगद्यांमधून तो जात नव्हता.
रत्नागिरीपर्यंत जहाजाने आणि तेथून रस्त्याने पुण्याकडे नेण्याचाही विचार करण्यात आला. मात्र, ती कल्पनाही अंमलात आणणं शक्य नव्हतं.शेवटी एक खास कमी उंचीची व्हॅगन बनवून रेल्वेद्वारेच तो पुतळा आणण्याचं ठरलं. तरीही पुतळा उंचच असल्याने काही मजूर बोगदा आल्यावर पुतळा तिरपा करायचे.सर्व संकटं पार करत पुतळा सुखरूप पुण्यात पोहोचला. पुण्यात या पुतळ्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली.
 
पुतळ्याचे लोकार्पण
16 जून 1928 रोजी छत्रपती राजाराम महाराजांनी या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यासाठी त्यावेळचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर विल्सन उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याने महाराष्ट्राला एक नवचेतना दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक बनले.
भांबुर्डा इथे हा पुतळा उभारण्यात आल्यानंतर हा परिसर शिवाजी नगर नावाने ओळखला जाऊ लागला.
एका हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेले महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेनंतरच्या कालखंडातील ध्येयपूर्तीचे समाधान चेहऱ्यावर दर्शविणारी या पुतळ्याची भावमुद्रा आहे.अजूनही हा पुतळा सुस्थितीत असून ऊन वारा पाऊस झेलत डौलात उभा आहे.
(संदर्भ - इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी दिलेल्या माहितीवर आधारित, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे संकेतस्थळ )
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Published By- Priya Dixit