गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:33 IST)

गाद्या भरण्यासाठी कापसाऐवजी चक्क वापरून फेकलेल्या मास्कचा वापर, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

गादी कारखान्यात गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या मास्कचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. रविवारी कुसुंबा गावातील दक्ष नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गादी कारखाना चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
अमजद अहमद मन्सुरी (वय 38 रा. आझादनगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर डापकर यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुरी यांचे कुसुंबा नाका परिसरात महाराष्ट्र गादी भंडार नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या मास्कचा ढीगारा पडला होता. कुसुंब्याचे पोलीस पाटील राधेशाम चौधरी, उपसरपंच विलास कोळी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी एमआयडीसी पोलीसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मास्क कोठून आणले? याचीही माहिती त्याने दिली नाही. आपण रुग्णालयात दाखल होतो. मास्क कोणी आणले हे माहीत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी गादी कारखाना चालकावर गुन्हा दाखल केला आहे.