रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (08:17 IST)

राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये पार पडणार

राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये पार पडणार आहे. या अधिवेशनाला म्हणजेच १९ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अतीशय संवेदनशील आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढण्यासाठी या सरकारने मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना प्राधान्य हे सरकार देत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सरकारकडून जे जे काही करता येईल ते आम्ही करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच सीमावाद अतिशय गांभीर्याने घेतला आहे. सीमावादावरून कोणीही राजकारण करू नये. सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याकडे आमचा फोकस आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी स्पष्ट केलं.
 
आम्ही ४ महिन्यात एवढं काम केलं की, पुढील दोन वर्षांत आम्ही किती काम करू याची धास्ती काही लोकांनी घेतली आहे. दिवाळीच्या शिध्यावरून देखील या सरकारवर टीका केली. परंतु, दिवाळीचा सिधा किती लोकांपर्यंत पोहोचला याची आमच्याकडे आकडेवारी आहे.जवळपास ९६ टक्के लोकांना दिवाळीचा शिधा पोहोचला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे खोक्यांचं सरकार असल्याची टीका केली होती. यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या तोंडून खोक्याची भाषा शोभत नाही. खोक्यांचे थर लावले तर शिखर इतकं उंच होईल की समजणार पण नाही. या राज्याला आम्हाला लवासा करायचं नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना टोला लगावला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor