रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (23:28 IST)

या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही : भुजबळ

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.  या आरोपांवर आता भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आज फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला गेला आहे. या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही”, असं भुजबळ म्हणाले आहेत.
 
घराबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले कि, “ते घर जुनं होतं. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. ते पाडून त्यावर २.५ एफएसआय मिळतो. त्या इमारतीचे अर्ध माळे मूळ मालकाला आणि अर्धे आम्हाला राहणार आहेत.” पुढे भुजबळ म्हणाले कि, “खरंतर चार ते पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. प्रॉपर्टीज अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन ही नाशिकपासून २० किमी लांब आणि १९८० मध्ये घेतलेली आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. म्हणूनच हा दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे का? पण, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. आम्ही लढत राहू.”
 
भुजबळ किरीट सोमय्यांवर टीका करताना पुढे म्हणाले कि, “माझं वय ७५ आहे. त्यावेळी आम्ही १० हजार, १५ हजार रुपये एकराने घेतलेल्या जागा आहेत. त्या जागांचा भाव आता वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. आम्ही ७५ वर्षे काय घरातच बसलो होतो का बोळ्यानं दूध पित? आम्ही पण काहीतरी काम धंदा केला आहे ना. अजूनही आमचे काही व्यवसाय सुरु आहेत. पण आम्ही तुमच्यासारखे खोटं बोलून, खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही. वारेमार आरोप करायचे हे तुमचं कामच आहे. मी याविषयी जास्त बोलणार नाही. मी फक्त इतकंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र देखील तथ्य नाही. आज त्यांनी फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला.”