गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (14:09 IST)

वेदांता-फॉक्सकॉनसाठी कुठलाही एमओयू झाला नव्हता – उदय सामंत

uday samant
“वेदांता-फॉक्सकॉनसाठी कुठलाही एमओयू झालेला नव्हता, त्याची साधी सहीसुद्धा झाली नव्हती. त्याचा रेकॉर्डसुद्धा एमआयडीसीमध्ये नाही,” असं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय.
कुठलाही प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गेलेला नाही, जे प्रकल्प गेले ते आधीच्या सरकारच्या काळात गेले आहेत, असा दावासुद्धा सामंत यांनी केला आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर आरोप केले होते. त्याला आज (बुधवारी) उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं.
 
जे प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर गेल्याचा आरोप होत आहे त्याची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमू, अशी घोषणासुद्धा उदय सामंत यांनी केलीय. येत्या महिनाभरात त्याचा अहवाल येईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच याबाबत श्वेतपत्रिका काढण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलंय.
 
शिंदे सरकारच्या काळात कुठलाही प्रकल्प गेलेला नाही, वेदांता जरी गेली असली तरी त्याच्या तोडीचे प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असं आश्वासन सामंत यांनी दिलं आहे.
 
14 जुलैला देवेंद्र फडणवीसांनी वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा, यासाठी पत्र लिहिल्याचं सांगत त्यांनी ते पत्रसुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवलं.
 
“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प सप्टेंबर महिन्यात गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प 100 नव्हे तर 1000 टक्के महाराष्ट्रात येणार होता. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्माण झाले असते. मात्र, ऐनवेळी हा प्रकल्प पलिकडच्या राज्यात गेला,” असा आरोप युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केला. 29 नोव्हेंबर पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी हा आरोप केला आहे.
 
मात्र, आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर देऊन, काही दिवस शांत झालेल्या या वादाला नव्यानं फोडणी दिलीय. आता पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये उद्योगांवरून ‘तू तू मैं मैं’ सुरू झालीय.
 
आदित्य ठाकरेंनी काय आरोप केले?
शिंदे-फडणवीस सरकारने एमओयू करण्यासाठी वेदांत-फॉक्सकॉनच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं.
 
आदित्य ठाकरे म्हणाले, “मी वेदांता-फॉक्सकॉनची माहिती तुम्हाला देत होतो. मला ट्विटरवरून कळलं की वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. ते कुठल्याही राज्यात जावं. त्याचं दु:ख नाही. पण जो प्रकल्प आपल्याकडे येणार होता, तो ऐनवेळा बाजूच्या राज्यात जातो, तेव्हा त्या उद्योगालाही त्रास होतो. दोन-तीन वर्षांत सुरू होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला सहा-सात वर्षं लागतात.
 
“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणा केल्या होत्या. पण आम्ही जेव्हा हा विषय काढला, तेव्हा आम्ही खोटं बोलतोय असं सांगितलं गेलं. महाविकास आघाडी सरकारच्याच काळात बाजूच्या राज्यात गेल्याचं सांगितलं गेलं.”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “आम्ही याबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवली होती. दीड महिन्यानं आम्हाला उत्तर आलं. हा प्रकल्प एक हजार टक्के महाराष्ट्रात येणारच होता. याचा पुरावा मी आणला आहे. जर हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात गुजरातला गेला असेल, तर या स्तरापर्यंत कसा पोहोचला?”
 
“5 सप्टेंबर 2022 चं पत्र माझ्याकडे आहे. हे तत्कालीन एमआयडीसीच्या सीईओंनी लिहिलं आहे. हे वेदांता-फॉक्सकॉनचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पाठवलं होतं. याचा विषय होता राज्य सरकार आणि वेदांतामध्ये एमओयू करण्यासंदर्भातला. तिथपर्यंत एखादा व्यवहार येतो, त्याचा अर्थ सगळं ठरलं असा असतो. फक्त कॅबिनेटची मंजुरी बाकी असते. पण हे खोके सरकार खोटे सरकार आहे.
 
"याआधीही या पत्राचा उल्लेख मी केला होता. पण माझ्या हातात ते पत्र नव्हतं. मला हे खोके सरकारमध्ये आमचे काही नाईलाजाने बसलेल्या लोकांनी सांगितलं होतं की अमुक एमओयूचं पत्र गेलं होतं,” असा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
 
तसंच, आदित्य ठाकरेंनी काही गंभीर प्रश्न या पत्रकार परिषदेतून विचारले. ते म्हणाले, “एकतर 26 जुलैला मंत्रालयात बैठक झाली होती. पण 29 ऑगस्ट 2022 रोजी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती. या बैठकीबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का?”
 
भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा पलटवार
आदित्य ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची बाजू मांडलीय आणि आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय.
 
केशव उपाध्ये म्हणाले, “मानलं बुवा आदित्यजींना, फॉक्सकॉन असो, एअरबस असो, मध्यप्रदेशातील उर्जा प्रकल्प असो की, बल्कड्रग पार्क, सॅफ्रान या सार्‍या प्रकल्पांबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी मंत्रालय सविस्तर पत्रपरिषद घेऊन सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती.
 
“पण, स्वत:चे दोष दुसर्‍यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसर्‍यांनी केले की, महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करायचा, हे त्यांनाच जमावे. दुसर्‍या कुणाची तशी हिंमतही होणार नाही.
 
“फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे सुभाष देसाईंनीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगितले होते. शिवाय, उद्योग येण्यासाठी जे मंत्रिमंडळ निर्णय करायचे असतात, ते केले नव्हते. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 15 महिने घ्यायची नाही आणि आरोप भाजपावर करायचे. केवढी हिंमत?
 
“राज्यात नवीन सरकार आले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, तर त्यावर शंका उपस्थित करायची. फॉक्सकॉन हा महाविकास आघाडीने घालविलेला प्रकल्प आहे. त्यांना आरोप करण्याचा अजिबात अधिकार नाही, ही वस्तुस्थिती असताना आरोप केले जातात.”
तसंच, यावेळी केशव उपाध्येंनी आदित्य ठाकरेंनी आजच पत्रकार परिषद का घेतली, याबाबतही शंका उपस्थित केली.
 
“आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेसाठी आजचा दिवस का निवडला गेला, याचे कारण सापडले आहे. सकाळी महाराष्ट्रात 10,500 कोटींच्या गुंतवणुकीसाठी जागा दिली गेली आणि लगेच पत्रपरिषदेचे निरोप गेले. मानलं बुवा या महाराष्ट्रद्रोहींना! आमची विनंती आहे, आमच्यावर टीका करण्याच्या नादात राज्याची बदनामी करू नका,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
Published By- Priya Dixit