शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (08:04 IST)

विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती होणार उद्योगमंत्री उदय सामंत

uday samant
कोकण येथील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीबाबत  मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी या प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पालासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणामधील पाणी वापरणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच यामधून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
त्यावेळी उदय सामंत म्हणाले की, राजन साळवी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती. याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करत आहेत आणि जे समर्थन करत आहेत, या सर्वांच्या शंका दूर करायच्या आहेत पण आधी याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले स्थानिक आमदार राजन साळवी यांनी आमच्या विभागाला या रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र दिले होते त्यावर चर्चा झाली.
 
तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत एक पत्र दिले होते. त्यानुसार, १३ हजार एकर जागेचे संपादन बारसूमध्ये होऊ शकते. परंतु यामध्ये सोलगाव, शिवणे, देवाचे गोठले या गावांनी याला विरोध केला होता. साळवी यांची मागणी होती की, ही तीनही गावे या प्रकल्पामध्ये येणार नाही, ही मागणी मान्य करण्यात आली आहे. एकूण ६,२०० एकर जागा या प्रकल्पासाठी मिळवायची आहेत त्यापैकी २९०० एकर जागेसाठी तिथल्या जमीन मालकांनी संपत्तीपत्रे दिलेली आहेत. या प्रकल्पाचा आवाका २ लाख कोटीचा आहे.
 
यामध्ये बांधकाम फेजमध्ये सुमारे १ लाख लोकांना रोजगार, ऑपरेशन फेजमध्ये ३ लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार ७५ हजार लोकांना मिळणार आहे, असे देखील यावेळी सामंत यांनी सांगितले आहे. तसेच कोयना धरणामधून पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे. ज्या शहरामधून गावातून ही पाईपलाईन जाईल, त्यांना देखील पाण्याचा टॅब दिला जाणार आहे पण पाणीपट्टी संबंधीत गावांनी भरायची आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor