गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (21:37 IST)

म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल

uddhav thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या गटाने आपलाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा केल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून वाद निर्माण झाला आहे. हे चिन्ह आपल्या हातून जाऊ नये म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
 
राज्यातील सत्तेतून पायउतार होताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी शिवसेना भवनात बैठकित  मी नव्याने सुरुवात करतोय. मी 19 जून 1966च्या मानसिकतेत आहे. तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हते, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचं आहे, असे त्यांनी म्हटले होते. तेव्हाच धनुष्यबाण आपल्या हातून निसटण्याची चिन्हे त्यांना दिसली होती.

 मात्र नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी, कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद केले आहे, त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ती चिंता सोडा, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळे करू शकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. हे घटनात्मक आणि कायदेशीर अभ्यासक आहेत, त्यांच्याशी बोलूनच सांगत आहे, अशी पुस्तीही त्यांनी त्यावेळी जोडली होती.
 
असे असतानाही उद्धव ठाकरे यांनी आपले धनुष्यबाण हे चिन्ह वाचविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नका, अशी विनंती ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.