शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:00 IST)

हा तर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान : संजय राऊत

“पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
“मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
 
संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव न घेता टीका करताना मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मतं मागण्याचा अधिकार नाही. ही लोकं जी निवडून आली आहेत त्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. मुंबईचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येथे राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही,” असं म्हटलं आहे.