अजित पवार आणि शरद पवार या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद
राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रतेवर निकाल जाहीर केला आहे. दोन्ही गटातील आमदार पात्र ठरवले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिका डिसमिस केल्या आहेत. त्यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालात म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही, परिणामी दहाव्या सूचीनुसार कोणावर अपात्रतेची कारवाई करता येत नाही.
"शरद पवार गटाने आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार गटाने दहाव्या सूचीचा गैरवापर करु नये, असंही नार्वेकर म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटाच्या तिनही याचिका फेटाळल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचा या सर्व घटनांशी काहीही संबंध नसतो, तो काद्याचा पालक असतो, पक्षांतर्गत वाद हे त्या त्या पक्षानं आपापसात मिटवायला हवेत,असंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदार अपात्रतेची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आहे.
विधानसभा अध्यक्षांचे निरीक्षण काय?
पक्षातील कार्यकारणी सर्वात महत्वाची आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समित्यांची बाजू समजून घेतल्या. कार्यकारणी आणि अध्यक्षांचे अधिकार लक्षात घेतले. दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. ३० जून २०२३ ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचे आहे. मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र ते गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे.
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor