रुग्णभरतीबाबत औरंगाबाद घाटीची अशी आहे नवी एसओपी
औरंगाबादमध्ये रात्री अपरात्री आलेल्या कोरोनाबाधितांनाही घाटीत उपचार दिले जातील. रुग्ण गंभीर नसला तरीही इतर आजार नसलेले, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही व सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना घाटीत भरती करण्यात येईल. रुग्णांची गरज पाहून त्यांना कोविड केअर केंद्रात पाठविण्यात येणार आहे. रुग्ण भरती व संदर्भित करण्याबाबत घाटी प्रशासनाने नवीन एसओपी तयार केली आहे.
घाटीत रात्री बेरात्री घाटी रुग्णालयात आलेले व इतर आजार नसलेले, ऑक्सिजनची गरज नसणाऱ्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही भरती करण्यात येईल. रात्रभर उपचार केल्यानंतर या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दुसऱ्या दिवशी पाठविण्यात येईल. तीन दिवस घाटी रुग्णालयात भरती केल्यानंतर त्या रुग्णांची कृत्रिम ऑक्सिजनची गरज नसेल अशा रुग्णांची यादी महापालिकेकडे देण्यात येईल. त्यानंतर ज्यांना खुपच कमी ऑक्सिजनची गरज असेल तर त्यांना मेल्ट्रॉन व उर्वरित रुग्णांना कोविड केअर सेंटरला पाठविण्यात येईल. खुपच कमी ऑक्सिजनची गरज आहे, वय साठपेक्षा कमी आहेत, इतर आजार नाहीत. हायरिस्क नाहीत असे रुग्ण गरजेनुसार आवश्यक त्या ठिकाणी पाठविण्यात येईल.
एसओपीमध्ये याचाही समावेशः
१) कोविड रुग्ण शिफ्ट करताना आधी कोविड केअर सेंटर अथवा समर्पित कोविड रुग्णालयातील भिषकांना (फिजीशियन) अनील जोशी, डॉ. कैलास चितळे यांच्यात रुग्णासबंधी तसेच खाटा उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात यावी. तसेच कोविड केअर सेंटर किंवा समर्पित कोविड रुग्णालयातील (डीसीएच) भिषकांकडून समर्पित कोविड रुग्णालयातील आरएमओ यांना माहिती द्यावी. त्यानंतर समर्पित कोविड रुग्णालयातील वार्डात आरएमओ रुग्णांना स्विकारण्यासाठी ट्रॉली व एक कर्मचाऱ्यांसोबत हजर राहतील व रुग्णांना भरती करुन घेतील.
२) रुग्णांना वार्डात पाठविण्याबाबत निर्णय होईपर्यंत आरएमओ त्यांना आवश्यकता असल्यास ऑक्सिजन व इतर सुविधा देतील. त्यानंतर वार्डात रुग्णाला स्थलांतरीत करावे.
३) समर्पित कोविड आरोग्य केंद्र, रुग्णालयातून (डीसीएचसी) दिवसातून दुपारी बारा ते दोन यावेळेतच रुग्णांना संदर्भित करण्यात यावे.