बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (07:52 IST)

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही – जयंत पाटील

दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील असेही ते म्हणाले.
 
दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. 
 
सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले. त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. पण मी त्या खोलात जात नाही. सध्या जे प्रमुख विषय आहेत त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.