बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (20:49 IST)

आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता, त्याचा हा भाग नव्हता : शरद पवार

sharad panwar
औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आले. मात्र या नामांतरावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  “आमचा किमान रणनीतीचा जो कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी त्याचा हा भाग नव्हता. तसेच, हा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, आमच्याशी याबाबत कोणाशीही सुसंवाद नव्हता. नामांतराबाबत निर्णय घेतल्यानंतरच आम्हाला समजले. निषेध वगैरे त्याला अर्थ नाही. त्यावेळी आम्हा सर्वांची सामूहिक समंतीही नव्हती. मंत्रिमंडळाच्या कामाची पद्धत असते. मंत्रिमंडळ कामाच्या पद्धतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. तिथे मतदान नसते. फक्त मतं व्यक्त केली जातात. मंत्रिमंडळ बैठकीत मतं व्यक्त केली गेली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो, त्याच पद्धतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला”, असे शरद पवार यांनी म्हटले.
 
“मात्र हा भाग समान कार्यक्रमात नव्हता. औरंगाबादच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या असत्या, तर इथल्या जनतेला त्याचा आनंद झाला असता. तसेच, शासकीय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्याची जी पद्धत होती, त्यामध्ये काहीही चर्चा झाली नाही. एक भावनेचा प्रश्न उपस्थित झाला नसता, तर मला आनंद झाला असता. पक्ष म्हणून हा निर्णय घेतलेला नव्हता. आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झाली. असा एकही प्रसंग नाही जो माझ्या कानावर आला नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.