शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (08:19 IST)

यंदा कास धरणात साठणार 300 दशलक्ष घनफूट पाणी

jayakwad dharan
ऐतिहासिक अशा साताऱ्याला पाणी पुरवठा करण्यासाठी कास येथे धरण  बांधण्यात आले. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्या वाढली अन् शहरातील नागरिकांना या योजनेचे पाणी कमी पडू लागल्याने धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. मार्च 2018 पासून कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम सुरु झाले. हे काम वेगाने सुरु असून सध्या घळभरणीचे काम सुरु आहे. 31 मे पर्यंत घळ भरणीचे माती काम पूर्ण होईल. त्यामुळे यावर्षी धरणात 300 दशलक्ष घनफुट एवढे पाणी साठणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सातारा शहरवासियांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
 
शहरातील सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना म्हणून कास उदभव योजनेकडे पाहिले जाते. या योजनेच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी उघडय़ा पाटाने महादरे हत्ती तलाव, महादरे तलाव मार्गे पाणी पुरवठा होत होता. शहरात ठिकठिकाणी हौद होते. त्या हौदापर्यंत कास योजनेचे पाणी पोहचवले जात होते.

कालांतरांने उघडय़ा पाटाऐवजी खापरी पाईपलाईने पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. खापरी पाईप लाईनमध्ये पुढे बदल करण्यात आला. सांबरवाडी येथे फिल्टरेशन टँक पॉवर हॉऊस येथे एक टाकी तेथून पुढे वेगवेगळय़ा टाक्यांना अशी वितरण व्यवस्था सातारा शहरात करण्यात आली. परंतु तरीही पाण्याची टंचाई भेडसावू लागल्याने कास धरणाचीच उंची वाढवण्याचा निर्णय झाला अन् सर्व मंजूऱया मिळवून 2018 मध्ये प्रत्यक्ष धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामास प्रारंभ झाला. बघता बघता धरणाची उंची वाढवण्याचे काम वेगाने सुरु झाले. सध्या 75 टक्के धरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला 25 कोटींचा निधी होता आता त्यात वाढ करुन सुमारे 50 कोटीहून अधिक निधी करण्यात आल्याचे समजते. वेगाने काम सध्या सुरु आहे. घळभरणीचे काम पुर्ण झाल्यानंतर धरणाचे मातीकाम व पिचींगचे काम शंभर टक्के पुर्ण होणार आहे. 31मे पर्यंत धरणाचे माती काम पूर्ण होणार आहे.

यावर्षी धरणात अंशतः वाढीव पाणीसाठा होणार आहे. गेली 135 वर्ष 1122.40 मीटर तलाकांनुसार 107 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होत होता. धरणात पुर्ण क्षमतेने 1134.00 मीटर तलांकापर्यंत पाणी अडवायचे आहे. सध्या अंशतः पाणीसाठा करण्याचे काम सुरू असुन 1130.50 मीटर तलांकापर्यंत यंदा पाणी अडवले जाणार असुन दरवर्षीपेक्षा 8.10 मीटर जास्त पाणी अडवले जाणार आहे.