शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:11 IST)

यंदा मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, अशोक चव्हाण यांनी दिली ग्वाही

यंदा होळीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा वाहतूक कोंडीत खोळंबा होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेतला जाईल. तसेच वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी लक्ष दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या प्रश्नावर ते मंत्री अशोक चव्हाण बोलत होते. 
 
कोकणात होळीसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कुटुंबासह प्रवास करतात. त्यामुळे या काळात मुंबई गोवा महामार्गावर ८ ते १० तास वाहतूक कोंडीत जातात.  त्यामुळे या प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी विधान परिषदेत लक्ष्यवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. या मार्गाच्या पूर्णपणे काम होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे? असाही सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. कोणत्या अडचणीमुळे या मार्गाचे काम रखडले आहे? असाही सवाल त्यांनी केला.
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गावर भूसंपादन आणि वनजमीनींचा प्रश्न या प्रकल्पाच्या कामाच्या पूर्ततेसाठी वेळ लागण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान देवस्थानच्या भूसंपादनाचे विषय आहे. पण हा विषय मार्गी लागला आहे. मे २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. रस्त्याशी संबंधित कामे ही डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई गोवा महामार्गाचे ४७१ किलोमीटरपैकी २७७ किमी काम म्हणजे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. अद्यापही १६१ किलोमीटरचे काम बाकी आहे. हे काम मे २०२३ अखेरीस पूर्ण होईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.