शहरातून तीन मुलींचे अपहरण
शहर परिसरातून अज्ञात व्यक्तींनी फूस लावून तीन मुलींचे अपहरण केल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.अपहरणाचा पहिला प्रकार अमृतधाम येथे घडला. याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या काकूने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की फिर्यादी यांची १७ वर्षीय पुतणी ही ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पंचवटीतील के. के. वाघ कॉलेज येथे गेली होती. दरम्यान, तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कॉलेजच्या आवारातून फूस लावून अपहरण केले. ही मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी आली नाही. तिचे कोणी तरी अपहरण केले असावे, यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद नोंदविण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
अपहरणाचा दुसरा प्रकार मुंबई नाका परिसरात घडला. फिर्यादी महिलेची मुलगी दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. म्हणून तिला कोणी तरी अज्ञात इसमाने अल्पवयीन पणाचा फायदा घेऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहार झालेल्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीवंत करीत आहेत.
अपहरणाचा तिसरा प्रकार पाथर्डी गाव येथे घडला. पाथर्डी गाव येथून अज्ञात इसमाने मुलीस फूस लावून पळवून नेल्याची नोंद करण्यात आली आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांची मुलगी ही दि. ३१ मार्च रोजी पाथर्डी गावातील एका किराणा दुकानाजवळ असताना अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.