विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पासून भाविकांना थेट करता येईल पददर्शन
करोनामुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून भाविकांच्या दर्शनाला बंदी आहे. मात्र, आज (दि. 2) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविकांसाठी पुन्हा एकदा पददर्शन सुरू झाले आहे.
त्यामुळे आज सकाळपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. पददर्शन पुन्हा सुरू झाल्याने आज वारकऱ्यांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे. काही वारकऱ्यांनी आजच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगही केले होते.
गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. विठुराया आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिराचे खांब आकर्षक फुलांनी आणि दोन टन फळांनी सजले आहेत.