शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:34 IST)

शाहू स्मृतीशताब्दीनिमित्त देशात विविध कार्यक्रम राबवा..!---------खासदार संभाजीराजे

कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने देश पातळीवर विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात शुक्रवारी त्यांनी संसदेच्या अधिवेशनात या संदर्भात मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
 
संसदेच्या कामकाजात संभाजीराजे यांनी सामाजिक क्रांतीचे प्रणेते असणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे स्मृतीशताब्दी वर्ष यावर्षी 6 मे 2022 पासून सुरू होत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, शाहू महाराजांनी शोषित व वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोल्हापूर संस्थानात 1902 साली आरक्षणाची योजना राबवली. त्यांनीच भारतात सर्वप्रथम बहुजन समजाला शिक्षण व नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षण दिले. अस्पृश्यता निवारणाचे कायदे करून सामाजिक परिवर्तन घडविणारे ते राजे होते. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत कला, क्रीडा, संस्कृती, उद्योग, शेती, प्रशासन या सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणले. संगीत, नाटय़, चित्रकला व मल्लविद्येस त्यांनी विशेषत्वाने प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रात सहकार चळवळीचा पाया रोवला. उद्योग व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. शेतकऱयांना स्वतःची व्यापारपेठ उपलब्ध करून दिली. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबविल्या. आपल्या प्रजेला सुशिक्षित करून त्यांना प्रशासकीय निर्णय घेण्यास सक्षम बनवणे व तद्नंतर लोकशाही प्रदान करणे, हे त्यांच्या राज्यशैलीचे मुख्य उद्दिष्ट होते. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी उच्चशिक्षणासाठी विनाअट मदत केली होती. 1920 साली झालेल्या माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बहुजनांचे नेतृत्व हे डॉ आंबेडकर करतील व संपूर्ण भारताचे पुढारी होतील, असे सूतोवाच केले होते. त्यांच्या राज्याभिषेकाच्या शताब्दीचे औचित्य साधून 1974 साली भारत सरकारने त्याचे पोस्ट कार्ड प्रकाशित केले होते. संसद भवनाच्या प्रांगणात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा देखील आहे. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल फारसे प्रकाशित झाले नाही. भावी पिढीला शाहूंचे कार्य समजून सांगण्याची संधी आपल्याकडे आहे. त्यामुळे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त केंद्र शासनाने 6 मे 2022 पासून संपूर्ण वर्षभर देशव्यापी कार्यक्रम आयोजित करावेत, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.