गडचिरोलीत अवकाळी पावसाचे थैमान! वादळी वाऱ्यांमुळे घरे उद्ध्वस्त तर पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोलीत अवकाळी पावसाने बुधवारी रात्री उशिरापासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी झोडपून काढले. सकाळी, जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने विदर्भासह जिल्ह्यात १७ ते २० मार्च दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार, मंगळवारी रात्री उशिरा मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहू लागले. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत वादळाने हाहाकार माजवला. वादळामुळे गडचिरोली शहर आणि आसपासच्या परिसरातील झाडे उन्मळून पडली.
दुकानांवरील पत्रे आणि काही घरांची छपरे उडून गेली. गडचिरोली तसेच अहेरी, सिरोंचा, आरमोरी आणि धनोरा तालुक्यांतील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कृषी विभागाने तातडीने पंचनामा काढून बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची कापणी करत आहे. काही जण मळणीत व्यस्त आहे. अनेकांनी आधीच पिकांची कापणी केली असून, मळणी न झाल्यामुळे ती शेतातच पडून आहे. या पिकांमध्ये हरभरा, उडीद, मूग, गहू, मका, तूरी, ज्वारी, कोथिंबीर इत्यादींचा समावेश आहे. विविध ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा आणि मिरचीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली आहे.
गडचिरोली, अहेरी, सिरोंचा, धनोरा आणि आरमोरी तालुक्यांच्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला. या वादळामुळे अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आणि वीजवाहिन्याही तुटल्याने अनेक गावकऱ्यांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.
Edited By- Dhanashri Naik