बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (21:36 IST)

नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार

accident
शहरात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये दोन महिलांसह एक पुरुष ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.

अपघाताचा पहिला प्रकार आडगाव शिवारात घडला. फिर्यादी रामदास दगू क्षीरसागर (वय 61, रा. खेडे, पो. उगाव, ता. निफाड) हे व त्यांची पत्नी सुशीला क्षीरसागर (वय 50) हे पती-पत्नी एमएच 15 सीएस 6021 या क्रमांकाच्या शाईन मोटारसायकलीवरून मुंबई-आग्रा महामार्गाने पिंपळगावकडे जात होते. आडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळील तारा पेट्रोल पंपासमोर आले असता क्षीरसागर यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात पांढर्‍या रंगाच्या कारवरील चालकाने त्यांच्या मोटारसायकलीस धडक दिली. त्यात क्षीरसागर दाम्पत्य जखमी झाले. दरम्यान, उपचार सुरू असताना सुशीला क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बस्ते करीत आहेत.
 
अपघाताचा दुसरा प्रकार द्वारका येथील उड्डाणपुलावर घडला. याबाबत पोलीस हवालदार युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जैनुलाबेदीन हुसैनी नामपूरवाला (वय 36, रा. गुरुद्वारा रोड, मालेगाव) व मोहंमद अन्वर मोहंमद हे दोघे जण एमएच 41 एएन 5752 या क्रमांकाच्या मोटारसायकलीवर डबलसीट बसून द्वारका सर्कल बाजूकडून उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने मोटारसायकलीचा अपघात केला, तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला. या अपघातात जैनुलाबेदीन नामपूरवाला यांचा अपघात झाला. हा अपघात दि. 22 जून रोजी रात्री 10 च्या सुमारास घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
 
अपघाताचा तिसरा प्रकार गडकरी चौकात घडला. फिर्यादी अलका कैलास शिंदे (वय 43, रा. शिंदे मळा, म्हसरूळ-वरवंडी रोड, नाशिक) ही महिला तिची जाऊबाई मंगला हरिश्‍चंद्र सिंगे (वय 57) यांच्याबरोबर एमएच 15 एफयू 2696 या क्रमांकाच्या रिक्षाने महामार्ग बस स्थानक येथील प्रवास करीत होती. त्यावेळी सारडा सर्कलकडून गोल्फ क्‍लबच्या दिशेने जाणार्‍या एमएच 17 एझेड 5093 या क्रमांकाच्या मोटार कारवरील चालक प्रतीक अशोक भांगरे (वय 35, रा. सोनाली अपार्टमेंट, विसे मळा, नाशिक) याने शिंदे प्रवास करीत असलेल्या रिक्षाचालक शक्‍ती ओम्प्रकाश शर्मा (वय 23, रा. आकाश पेट्रोल पंपामागे, म्हसरूळ) याने चौकामध्ये वेग कमी न करता, तसेच सिग्नल यंत्रणा व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटार कार व रिक्षा भरधाव वेगाने चालवून एकमेकांना जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांची जाऊबाई मंगला शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात रिक्षाचालक शक्‍ती शर्मा व कारचालक प्रतीक भांगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.