क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून तब्बल तीन लाखाला गंडा
क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून एकास तब्बल तीन लाख रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी अनिल गोपिंचद चव्हाण (43 रा.गुलमोहर कॉलनी,पाईपलाईन रोड,नाशिक ) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांच्याशी गेल्या १७ मे रोजी भामट्यांनी 18604195555 या क्रमांकावरून संपर्क साधला होता. यावेळी वापरत असलेल्या अॅक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डवरील रिवार्ड पॉईंट मिळविण्यासाठी लिंक पाठविण्यात आली होती. रिवार्ड पॉईंट डॉट इन या लिंकवर ऑनलाईन पेजवर भामट्यांनी क्रेडिट कार्ड नंबर, जन्म तारीख, मेल आयडी व मोबाईल क्रमांक बाबतची माहिती भरण्यास भाग पाडले. यानंतर आलेल्या ओटीपीची माहिती मिळवित भामट्यांनी चव्हाण यांच्या क्रेडिट कार्डचा अनधिकृत व्यवहार करून तीन लाख रूपयांना गंडा घातला. याप्रकरणी संपर्क साधणारा मोबाईलधारक,रक्कम वर्ग झालेला खातेधारक आणि ज्याच्या नावे फसवणुकीतील रकमेतून परस्पर खरेदी झाली त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.