मुख्य सचिवपदासाठी निवडणूक आयोगासमोर तीन नावे
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने करीर यांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा होती, मात्र राज्य सरकारने करीर यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव न पाठवता सुजाता सौनिक यांच्यासह राजेश कुमार मीना आणि इकबालसिंह चहल या 3 ज्येष्ठ सनदी अधिकार्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला बुधवारी सुचवली आहेत.
त्यानुसार शनिवारपर्यंत या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन राज्याला नवे मुख्य सचिव मिळणार आहेत. त्यातही सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणार्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरतील. याआधी राज्य सरकारने एकट्या सुजाता सौनिक यांच्याच नावाची शिफारस निवडणूक आयोगाकडे केली होती, परंतु आयोगाने हे एकमेव नाव बुधवारी दुपारी फेटाळून लावले. त्यानंतर तीन अधिकार्यांची नावे सुचवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार 3 नावांची नवी यादी आयोगाला पाठवण्यात आली आहे.
सन 1987च्या बॅचच्या आयएएस आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सौनिक यांच्यानंतर 1988च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार मीना आणि 1989च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) इकबालसिंह चहल हे अधिकारी मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत आहेत. त्यानुसार या तिघांची नावे राज्य सरकारकडून मुख्य सचिवपदाच्या मंजुरीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीर यांना मुदतवाढ देण्याऐवजी नवा मुख्य सचिव नियुक्त करण्याचे ठरवले. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने नितीन करीर यांचा कामकाजाचा गुरुवार हाच अखेरचा दिवस ठरणार आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor