भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या त्या मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत. पण त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. मागची 15 वर्षं पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारण कायम चर्चेत राहीलं. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तर कधी त्यांच्या राजकीय संघर्षासाठी. पंकजा यांचं सुरूवातीचं राजकारण वडीलांच्या छत्रछायेखाली सुरू झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून राजकारणात प्रवेश केल्यानंतर मुंडे कुटुंबात ठिणगी पडली. भाऊ विरूध्द बहीण हा सुप्त संघर्ष सुरू झाला. भाऊ राजकीय मैदानात समोर येऊन उभा राहीला. 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर पंकजा यांच्या राजकारणाची खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. “मुंडे साहेब असताना कोणाला कधी उमेदवारी मागायची गरज पडली नाही. तसंच एक दिवस मला मुंडेसाहेब म्हणाले, पंकजा तुला परळी विधानसभा लढवायची आहे. तेव्हा मी म्हटलं बाबा माझा राजकारणाशी काय संबंध? ते म्हणाले, टीव्ही लाव, तुझी उमेदवारी घोषीत झाली आहे. आता तुला लढावं लागेल. नाहीतर माझं नाक कापलं जाईल. तेव्हापासून मी मुंडेसाहेबांची आज्ञा कधीही डावलली नाही,” पंकजा यांनी एका भाषणात सांगितलेला हा प्रसंग.
'तेव्हा मी राज्यात राहीले नसते तर खूप मोठी गडबड झाली असती'
2009 साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2009 सालच्या विधानसभा निवडणूकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण पंकजा यांच्यापेक्षा धनंजय मुंडे राजकारणात जास्त सक्रीय होते. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेंकडे बघितलं जात होतं. पंकजा यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. पण पंकजा यांच्या राजकारणात येण्याने धनंजय विरूध्द पंकजा या सुप्त संघर्षाला सुरूवात झाली होती. 2013 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून वेगळा मार्ग निवडला. गोपीनाथ मुंडेंसाठी तो धक्का होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण त्यानंतर काही दिवसांतच त्यांच अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बीडच्या लोकांमध्ये मोठा आक्रोश होता. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या निधनाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यातून इथे उपस्थित असलेल्या नेत्यांवर मुंडे समर्थकांनी दगडफेक करायला सुरूवात केली. काही नेते बचावले, काहीच्या गाड्या फुटल्या. पोलीस प्रशासन, नेते कोणाचही न ऐकणाऱ्या मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे यांनी हात जोडून शांत राहण्याचं आवाहन केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली. तेव्हा पंकजा मुंडे या लोकांसमोर ठळकपणे अधोरेखीत झाल्या. कुटुंबाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली होती. पंकजा यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून बघितलं जाऊ लागलं. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या जागी लोकसभेवर कोण निवडून जाणार? हा प्रश्न होता. तेव्हा राजकारणात फार सक्रीय नसलेल्या प्रितम मुंडेंना लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंकजा मुंडे म्हणतात, “आमच्याबरोबर कोणीही आमदार नसताना गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिक्याने 2014 साली लोकसभेवर निवडून आले आणि 17 व्या दिवशी त्यांचं निधन झालं. बीडच्या लोकांना कोणीही उमेदवार नको होता. मुंडेंच्या जाण्याने लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. तेव्हाच्या राष्ट्रवादीने जाहीर केलं की, मुंडे घरातला उमेदवार असेल तर आम्ही निवडणूक बिनविरोध करू. तेव्हा मी जर राज्यात राहीले नसते तर खूप गडबड झाली असती. यासाठी मी प्रितम मुंडेंना तयार केलं.” प्रितम मुंडेही मोठ्या मताधिक्याने बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. पंकजा यांनी विधानसभा लढवून राज्यात राहण्याचा निर्णय घेतला.
पंकजा मुंडे राज्याच्या नेत्या झाल्या पण...
प्रितम मुंडे बीड लोकसभेवर पाठवून परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा यांनी स्वत: साठी राखून ठेवला. बीड लोकसभा आणि परळी विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ राखून ठेवण्याचा तो पंकजा यांचा प्रयत्न होता. 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पंकजा यांच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट होती. त्याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरात लाट होती. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे विरूध्द राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यात पंकजा मुंडे 96,904 मतं मिळवून विजयी झाल्या. धनंजय मुंडे यांना 71,009 इतकी मतं मिळाली होती. पंकजा या विजयी झाल्या असल्या तरी मोदी लाट आणि गोपीनाथ मुंडेंबाबत सहानुभूतीची लाट असूनही 25,897 मतांचा फरक हा धनंजय मुंडेंसाठी मोठा नव्हता. पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. त्या भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीतही सामिल झाल्या. महिला बालकल्याण, ग्रामविकास, जलसंधारण ही महत्त्वाची खाती पंकजा मुंडे यांना देण्यात आली. त्याचकाळात धनंजय मुंडे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले. भाऊ विरूध्द बहीण हा संघर्ष विधीमंडळातही दिसू लागला. राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाल्यानंतर काही वक्तव्यांमुळे पंकजा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या.
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे वक्तव्य त्यापैकीच एक. पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या दिसत होत्या. हे वक्यव्य त्यातूनच केल्याच बोललं गेलं. पंकजा यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे भाजपच्या नेत्यांशी अंतर्गत संघर्ष सुरू झाला. जुलै 2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा समोर आणला होता. या चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली. भाजपच्या नेत्यांशी अंतर्गत संघर्ष आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्याशी असलेला वाद यातून हा घोटाळा समोर आणल्याची त्यावेळी चर्चा होती. पंकजा यांनी या घोटाळ्याचं विधीमंडळात स्पष्टीकरण देताना अनेक भावनिक मुद्दे मांडले. भावनिक राजकारण करण्यापेक्षा आरोपांना उत्तर द्या, अशी टीका पंकजा मुंडे यांच्यावर झाली. या काळात बीडच्या पालकमंत्री असूनही त्यांचं मतदारसंघात लक्ष नसल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. 2015 साली झालेल्या नगरपालिका, 2017 साली झालेल्या जिल्हापरिषद आणि वर्षानुवर्ष गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व स्थानिक निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला होता. धनंजय मुंडे यांचं वर्चस्व वाढत होतं. पंकजा यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती. त्याच दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या मतभेदाच्या चर्चा समोर येत होत्या. चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजा यांचं जलसंधारण खातं काढून राम शिंदे यांना देण्यात आलं. त्यावरून पंकजा या कमालीच्या नाराज झाल्या होत्या. पंकजा यांचा जनसंपर्क कमी होत होता. त्यांची आक्रमकता ही भाषणातून दिसत होती. पण प्रत्यक्षात त्यांनी हाती घेतलेले ऊसतोड कामगार, ओबीसीचे प्रश्न आणि इतर अनेक मुद्दे सोडून दिलेले दिसले.
2019 नंतर राज्याच्या राजकारणातून काढता पाय?
2019 ची विधानसभा निवडणूक लागली. पुन्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत झाली. त्यात धनंजय मुंडे यांना 1,22,114 मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना 91,413 मतं मिळाली. त्यात पंकजा यांचा पराभव झाला. तेव्हा त्यांनी काही काळ आत्मचिंतनासाठी घालवला.आक्रमक वक्तव्यांमुळे त्या चर्चेत राहील्या परंतु मतदारसंघात कमी दिसू लागल्या. त्यानंतर पंकजा यांचं पुर्नवसन कसं केलं जाणार? याच्या चर्चा होत्या. विधानपरिषद की राज्यसभा? प्रत्येक निवडणुकीत पंकजा यांच्या पुर्नवसनाची चर्चा झाली. पण त्यांच्या हाती काहीच आलं नाही. 2020 साली पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हाच त्या भविष्यात राष्ट्रीय राजकारणात दिसतील अशी कुजबूज होती. 2019 ते 2024 पर्यंत मागची पाच वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. याच दरम्यान त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चासुद्धा रंगल्या. त्यावर “मी निष्ठेची इतकी लेचीपेची नाही. एकवेळ ऊस तोडायला जाईन पण निष्ठा गहाण टाकणार नाही,” असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे काही आमदारांसह महायुतीसोबत आले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडेही महायुतीत सामिल झाले. आता परळी विधानसभेचं काय होणार? हा प्रश्न समोर होता. जेव्हा पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, “मी आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यावर एका मुलाखतीत म्हटलं होतं, की, जेव्हा माझ्या आयडिऑलॉजीसोबत प्रतारणा करण्याची वेळ येईल, चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही.” त्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद मिटवण्यासाठी धनंजय यांनी पुढाकार घेतला. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बहीण पंकजाने औक्षण करून शुभेच्छा दिल्याचं ट्वीट त्यांनी केलं ही समेट झाली म्हणजे पंकजा यांना राज्यसभा मिळणार असं बोललं जात होतं. त्याबाबत बोलताना पंकजा यांनी पक्षावरची नाराजी बोलून दाखवली त्या म्हणाल्या, “गेल्या दोन वेळस मला पक्षाकडून विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यास सांगितलं. सकाळी नऊ वाजता मला फॉर्म भरायला यायलाही सांगितलं गेलं. पण दहा मिनिटं आधी तुम्ही फॉर्म भरू नका असं सांगितलं गेलं. पंकजा मुंडे पात्र आहेत की नाही हे मी स्वतःच कितीवेळा सांगणार? त्याचं उत्तर पक्षश्रेष्ठी देतील.” त्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
पंकजा मुंडे यांचं मुख्यमंंत्रिपदाचं ते वक्तव्य
पंकजा मुंडे या आक्रमक भूमिका आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहीले. त्यामुळे अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या त्याचबरोबर वरिष्ठांची नाराजीही त्यांना पत्करावी लागली. पंकजा मुंडे या मंत्री असताना 2015 साली त्यांनी पुण्यात भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी भाषण करताना मुख्यमंत्रिपदाची सुप्त इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, "मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर तेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असते. यापूर्वीही साहेबांना मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तेच होते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचे लोक तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त करत असतात. जनतेच्या मनातील भावना यावेळी मला कळते, ती भावनाच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."
पंकजा मुंडेंची ती ऑडिओ क्लिप
2016 साली भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर राजकीय भाषण करायला तीव्र विरोध केला. यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला. काहीही झालं तर भगवान गडावर भाषण करणारच असा पवित्रा तेव्हा मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी घेतला. त्याचबरोबर दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींचं काय करायचं हे भविष्यात बघून घेऊ, अशा आशयाची त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, "नामदेव शास्त्रींचं काय करायचं हे भविष्यात बघू आपण. पण आपल्याला दसरा मेळावा करायचा आहे. त्यामुळे कोणताही गलिच्छपणा होऊ द्यायचा नाही. आपल्याविषयी जर कोणी बोललं तर खपवून घ्यायचं नाही. परळीमध्ये लोकांना मारून, त्यांच्याविरुद्ध केस करून, त्यांनाच तडीपार करतो आपण. आम्ही पण काही साधे नाहीये. नालायक लोकांशी लढा द्यायचा तर ते करावं लागतं." या ऑडिओ क्लिपवरून पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
पंकजा मुंडे आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य
2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर हे सरकार काही महिन्यात पडणार असं भाजप नेत्यांकडून सांगितलं जात होतं. त्यावर टीका करत दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्वत:च्याच पक्षाला घरचा आहेर दिला. त्या म्हणाल्या होत्या, "विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार. सरकारी पक्ष म्हणतो नाही पडणार. सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत लक्ष घाला." 2022 साली राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “मी जनतेच्या मनात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत” बुलडाण्याच्या एका सभेत बोलताना पंकजा म्हणाल्या, "मी एका गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवून दहा परिक्रमा करेन, एखाद्या गरिबाच्या पायावर नतमस्तक होईन, पण पदासाठी कोणापुढे हात पसरण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाहीत."
Published By- Dhanashri Naik